मुंबई- राज्यात महाडीबीटी या संकेतस्थळावर शैक्षणिक वर्ष 2020-21च्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरले जात आहेत. मात्र, अर्ज भरत असताना विद्यार्थांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली. मुदत न वाढविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अभाविप कोकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार यांनी दिला.
त्वरित मुदत वाढवा-
शैक्षणिक वर्ष २०२०-२१च्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल 2021पर्यंत आहे. परंतु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आधीच कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणींना येत आहे. अशातच विधी आणि अन्य काही शाखेतील विद्यार्थ्याचे प्रवेश देखील प्रलंबित आहेत. त्यामुळे गुरूवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कोंकण प्रदेशाच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगर समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात अर्ज भरण्याची मुदत त्वरित वाढविण्यात देण्याची मागणी करत निवेदन देण्यात आले.
अभाविपचा आंदोलनाच्या इशारा-
महाडीबीटी या पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज भरताना तांत्रिक अडचणी बाबत तक्रार विद्यार्थ्यांकडून येत आहेत, राज्यात लावलेल्या कडक निर्बंधांमुळे कागदपत्रे मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करता यावे आणि त्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी समाजकल्याण विभागाने त्वरित मुदत वाढवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच मुदत न वाढविल्यास अभाविपच्या तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल, असा इशारा अभाविप कोकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार यांनी दिला.