मुंबई : जुनी पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या संपाचे आज विधान परिषदेत जोरदार पडसाद उमटले. 'एकच मिशन, जुनी पेन्शन', 'न्याय द्या, अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडला. दरम्यान विरोधकांनी पेन्शन विषयावर चर्चेची मागणी केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ती फेटाळून लावली. त्यामुळे दोन वेळा सभागृह तहकुब करण्यात आले. सभापती आणि विरोधकांमध्ये यावेळी जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी सभात्याग करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
विरोधकांनी केली चर्चेची मागणी : राज्यातील 18 लाख सरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर यांच्या संपाबाबत परिषदेतील शिक्षक पदवीधर आमदार कपिल पाटील यांनी राज्यात सुरू झालेल्या संपाकडे 289 अन्वये मुद्दा उपस्थित केला. जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने निवेदन सादर करावे आणि यावर सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी लावून धरली. सर्व शिक्षक आमदार आणि विरोधकांनी या मागणीला पाठिंबा दिला. सभागृहाचे कामकाज बाजूला ठेवून संपावर चर्चा करावी, अशी मागणी केली.
सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका : जुन्या पेन्शन योजने संदर्भात कॅगने सूचना दिले आहेत. तसेच राज्य सरकारला याबाबत मुद्दे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने अजूनही मुद्दे मांडलेले नाही. सरकार पेन्शनवर काय भूमिका घेणार ते स्पष्ट करावे, असा प्रश्न कपिल पाटील यांनी उपस्थित केला. तर, शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सरकारच्या बोटचेप्या धोरणावर सडकून टीका केली. तसेच १९८२पासूनची पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी, अशी मागणी आमदार काळे केली. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, जुन्या पेन्शनवर राज्यात निर्माण झालेली परिस्थिती गंभीर असून यावर तातडीने 289 अन्वये चर्चा घडवून आणावी, अशी मागणी केली. अभिजीत वंजारी यांनी या मागणीचे समर्थन केले.
सभागृहाचे कामकाज स्थगित : प्रश्नोतराच्या तासाला 289 नुसार विषय मांडायला परवानगी दिली आहे. कामकाज पत्रिकेत या विषयाचा समावेश नाही. त्यामुळे तो फेटाळून लावत असल्याचे उपसभापती नीलम गो-हे यांनी सांगितले. दरम्यान, प्रश्नोतराचा तास सुरू होताच, विरोधकांनी पुन्हा पेन्शन योजनेचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरले. विरोधकांनी व्हेलमध्ये उतरत 'एकच मिशन, जुनी पेन्शन', 'जुनी पेन्शन योजना लागू करा', अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. उपसभापती आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. त्यामुळे विरोधकांनी जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा देत, सरकार विरोधात निषेध व्यक्त करत सभात्याग केला.
हेही वाचा : Government Employee Strike : कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरूच; मात्र, 'या' संघटनेने घेतली माघार