मुंबई - काँग्रेसमधील बंडखोर माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी मातोश्रीवर भेट घेतली. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी सत्तार यांची मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घडवून आणली. अर्धा तासाच्या भेटीत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी सत्तार यांनी भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जालन्यात रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध दर्शवला होता. अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
आगामी काळात निवडणुका असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंशी सविस्तर राजकीय चर्चा झाली असून जो निर्णय होईल तो तुम्हाला कळवण्यात येईल, असे सत्तार म्हणाले. दोन्ही पक्ष श्रेष्ठींकडे चर्चा सुरू आहे. कोणत्याच पक्षात निर्णय न झाल्यास आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचेही सत्तार यांनी इटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.