मुंबई - राज्यातील वीज ग्राहकांची लॉकडाऊन दरम्यान आलेली 200 युनिट पर्यंतची वीजबिले माफ करावीत, ही मागणी घेऊन बुधवारी आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार आहेत.
कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थती बिकट बनली आहे. या परिस्थतीमध्ये त्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनलेले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये सामान्य माणसाला कोणतीही थेट मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारनेच राज्यातील नागरिकांचा आर्थिक ताण हलका करण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत.
बुधवारी होणाऱ्या या आंदोलनात आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी सामील होणार आहेत. गाव व शहर पातळीवरील सर्व वीज ग्राहक नागरिकांना वीज माफी आंदोलनात सामील करून घेतले जाणार आहे. सोशल मिडियाद्वारे वीजबिल माफ करा हा हॅशटॅग सर्वत्र चालवला जाणार आहे. दिल्ली येथील अरविंद केजरीवाल सरकार मागील दोन वर्षांपासून 200 युनिटपर्यंत वीज मोफत देत आहे. सामान्य नागरिकांची लॉकडाऊन काळातील विजेची बिले माफ झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे 'आप'च्यावतीने ही मागणी लावून धरण्यात येणार आहे असे आपचे मुंबई प्रवक्ते धनंजय शिंदे यांनी सांगितले.