खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांचा राजीनामा
ठाणे - खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी आज आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे कारण शर्मा यांनी दिले आहे. एक जिगरबाज पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख होती.
राजीनामा नियमाप्रमाणे देण्यात आला असून यावर निर्णय घेण्याचा अधिकार पोलीस महासंचालकांना आहे. यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेऊन हा राजीनामा देण्यात आल्याची चर्चा आहे.
09:10PM - धुळे जिल्हा परिषद राज्य सरकारकडून बरखास्त; प्रशासकाची नेमणूक
8:10 PM - कर्नाटकच्या राजकीय घडामोडी सांगलीपर्यंत...
सांगली - कर्नाटकाच्या कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या सांगलीतील घरात कर्नाटक पोलीस पोहचले होते. श्रीमंत पाटील यांना पळवल्याचा काँग्रेसने आरोप केला होता. श्रीमंत पाटील अचानक गायब झाल्याने कर्नाटक विधानसभेत दंगा झाला होता. कर्नाटक विधानसभा सभापतींचा आदेशानंतर कर्नाटक पोलीस चौकशीसाठी सांगलीत दाखल झाले होते. श्रीमत पाटील कागवाडचे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.
७:४७ PM - काँग्रेस-राष्ट्रवादीने 15 वर्षे महाराष्ट्र सडवला; आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका
जळगाव - सुजलाम सुफलाम असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार तसेच कार्यकर्ते चांगले काम करत आहेत. पण महाराष्ट्र अजून समृद्ध करायचा असेल तर आपल्याला कामाचा वेग वाढवावा लागणार आहे. नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जसा 15 वर्षे महाराष्ट्र सडवला तसा तो सडतच राहील. महाराष्ट्र जसा आहे, तसा थांबलेला पाहिजे का वेगाने पुढे जाणारा महाराष्ट्र पाहिजे, असे आवाहन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज शिवसेना कार्यकर्त्यांसह जनतेला केले.
०६.५५ PM - शेतकऱ्याकडून सहा हजार रुपयांची लाच घेताना पाथरी तहसीलचा अव्वल कारकून जाळ्यात
सायंकाळी 5.50 - भिवंडीत एक मजली धोकादायक इमारत कोसळली
सायंकाळी 4:45 - पतंजलीचा तेल उद्योग उभारा आणि तेलाच्या घाण्यातच आम्हाला घाला; पतंजलीच्या तेल उद्योगावरून शेतकरी उद्विग्न
लातूर - औसा तालुक्यातील शिंदळा येथील भेल प्रकल्पासाठी असलेली जमीन योगगुरू रामदेव बाबा यांना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे येथील शेतकरी आक्रमक देखील झाले असून या तेलाच्या घाण्यातच आम्हाला घाला, अशा उद्विग्न प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येत आहेत.
दुपारी 4:38 - नागपूर शहरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या हालचाली सुरू
नागपूर - शहरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्याची प्रक्रिया व्हावी यासाठी महापालिकेच्या जलप्रदाय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती पत्र पाठवले आहे. मध्यप्रदेशच्या चौराई धरणातून 3 टीएमसी पाणी मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे.
दुपारी ०४.२० - अभिनेता एजाज खानला सायबर पोलिसांनी केली अटक; मुंबई पोलिसांविरोधात केले होते आक्षेपार्ह टिकटॅाक
मुंबई - अभिनेता एजाज खानला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मुंबई पोलिसांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरत टिकटाँक केले होते. एजाज खानला यापूर्वीसुद्धा वेगळ्या गुन्ह्यात अटक झालेली आहे. बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर आज त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
दुपारी 04.13 - सोलापुरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एकजण ठार; नागरिकांमध्ये संताप
दुपारी 3.51 - पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस; कृषीमंत्री अनिल बोंडेंची माहिती
कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला असल्याची माहिती कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच केंद्र आणि राज्याच्या योजनांचा 112 कोटीचे अनुदान खर्च केले आहे. दुष्काळ प्रवण तालुक्यात 115 कोटी खर्च केले असल्याची माहितीही त्यांनी आज कोल्हापुरात दिली.
दुपारी 12.45 - दाऊद इब्राहिमचा पुतण्या मुंबईत जेरबंद, आता बाप-लेक दोघेही गजाआड
मुंबई - कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा पुतण्या आणि इकबाल कासकरचा मुलगा रिजवान कासरकर याला हवाला रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ही अटक करण्यात आली. वाचा सविस्तर
सकाळी 11.30 - २२ जुलैला चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार - इस्रो
बंगळुरू - तांत्रिक बिघाडामुळे चांद्रयान-२ चे उड्डाण रद्द करण्यात आले होते. आता सोमवार दिनांक २२ जुलैला 'चांद्रयान-२' अवकाशात झेपावणार असल्याची माहिती इस्रोने दिली. २२ जुलैला भारतीय प्रमाण वेळेनुसार, दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे उड्डाण होणार आहे. वाचा अधिक
सकाळी 11. 25 - जपानमध्ये क्योटो अॅनिमेशन स्टुडिओला आग; मृतांची संख्या 12 वर...
जपान - क्योटो येथील 'क्योटो अॅनिमेशन' या स्टुडिओला लागलेल्या आगीत 12 लोक दगावल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच 30 पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले आहेत. बचावकार्य आणि बेपत्ता लोकांचा शोध अजूनही सुरुच आहे. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास क्योटो येथील अॅनिमेशन स्टुडिओच्या तीन मजली इमारतीला आग लागली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ पसरवून ही आग लावली होती. ज्यामध्ये ती व्यक्तीही जखमी झाली. त्या व्यक्तीची ओळख जाहीर केली नसली तरी, पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन उपचारासाठी पाठवले आहे.
सकाळी 10.20 - बिहारमध्ये पुराचे थैमान...! ७३ जणांचा मृत्यू तर १२ जिल्ह्यात शिरले पाणी
पटना - नेपाळचा तराई भाग आणि उत्तर बिहारमध्ये बरसलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. पूरामुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील १२ जिल्हे पुरामुळे प्रभावीत झाले असून यामध्ये २५ लाख लोक आपत्तीमध्ये सापडले आहेत. आत्तापर्यंत पुरामध्ये ७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिक वाचा
सकाळी 9.05 - आंबेनळी घाटातील बस दुर्घटना प्रकरणाचा तपास थांबवण्याची पोलिसांची मागणी
रत्नागिरी - आंबेनळी घाटातील बस दुर्घटना प्रकरणाचा तपास थांबवण्याची मागणी रायगड पोलिसांनी न्यायालयात केली आहे. कोकण कृषी विद्यापीठाची गाडी दरीत कोसळून ३० जणांचा झाला होता मृत्यू.. प्रकाश भांबेड यांनीच बेदरकारपणे गाडी चालवल्याचा पोलिसांचा न्यायालयात दावा.. तपास थांबवण्याच्या परवानगीच्या पत्रामुळे दुर्घटनाग्रस्तांचे नातेवाईक नाराज, अपघातातून वाचलेल्या सावंत, देसाई यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी, पोलीस तपास थांबवला जावू नये, मृत नातेवाईकांची न्यायायलात मागणी..
सकाळी 8.55 - हिंगोलीत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
हिंगोली - तालुक्यातील कोथळज येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. भीमराव शिवाजी सोळंके (वय 18) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सकाळी 8.45 - अमरावतीत नदीत उडी घेऊन वृद्ध शेतकऱ्याने केली आत्महत्या, १ लाखाचे होते कर्ज
सकाळी 8.40 - दिल्लीत मुसळधार पावसामुळे छप्पर कोसळल्याने 13 म्हशी, 2 वासरे आणि 2 गायींचा मृत्यू झाल्याची घटना. नजाफरगृह मधील प्रकार
सकाळी 7.15 - नेपाळमधील पूरपरिस्थिती गंभीर, ८८ जणांचा मृत्यू ३३ बेपत्ता
काठमांडू - नेपाळमधील बहुतांश ठिकाणी पूराने थैमान घातले आहे. नेपाळच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ८८ वर पोहचली असून ३३ लोक बेपत्ता आहेत. ३३६६ हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
सकाळी 7.10 - करनाटकी तिढ्यावर आज पडदा पडणार? विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव
बंगळुरू - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कर्नाटकातील राजकीय घडामोंडीवर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. कुमारस्वामींच्या नेतृत्त्वाखालील सरकारला (धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस आघाडी) विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. सविस्तर वाचा