मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना म्हणाले की, हे चाळीस लोक स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचे दुसरे कोणतेही कारण नव्हते. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर आले होते. तेथे रडले होते. भाजपाबरोबर गेलो नाहीतर मला अटक होईल, असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केला आहे.
महाविकास आघाडीत मोठी खळबळ : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आदित्य ठाकरे यांच्या या विधानानतर खळबळ उडाली आहे. बंडखोरीबाबतचा आरोप-प्रत्यारोपाचा वाद पुन्हा आता आणखी वाढण्याची शक्यता दिसत आहे. अंजली दमानिया यांनी १२ एप्रिलला अजित पवार लवकर भाजपाबरोबर जातील, तसेच शिंदे गटाचे १५ आमदार अपात्र ठरतील, असा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी दमानिया यांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे प्रकरण ताजे असताना आदित्य ठाकरे यांनी शिंदेंच्या बंडखोरीवर मोठे विधान केल्याचे समोर आले आहे.
सत्तासंघर्षाचा बाबतचा युक्तिवाद पूर्ण : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाचा बाबतचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. निकाल कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. १६ आमदारांच्या अपात्रेबद्दल निर्णय अजून प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्ट याबाबत काय निकाल देते, याकडे फक्त राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागले आहे, अशा परिस्थितीत आता आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या शिंदे गट व ठाकरे गट एकमेकांवर फैरी झडत आहे. शिवसेनेत कोणत्या कारणामुळे बंड झाले, याची माहिती आता बाहेर येत असल्याचे दिसत आहे. हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या परिसंवादात आदित्य ठाकरे बोलत होते.