मुंबई : कोरोनाच्या दहशतीमुळे कोणीही कोणाच्या मदतीला धावून येत नाही. असाच अनुभव मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याबाबत घडला आहे. या कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली तर कोरोनाच्या भीतीने त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान रुग्णवाहिका येणे, रुग्णालयापर्यंतचे अंतर आणि कोरोनाच्या दहशतीमुळे या कर्मचाऱ्याला कोणी हात लावला नाही. त्याला वेळेवर उपचार मिळाले नाही त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या कर्मचाऱ्याचा मृत्यू केवळ निष्काळजीपणामुळे गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेत महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती व इतर समिती अध्यक्षांची तसेच पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांची कार्यालये आहेत. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती व इतर समिती अध्यक्षांच्या कार्यालयात पालिकेच्या चिटणीस विभागाकडून कर्मचारी नियुक्त केले जातात. अजित दुखंडे याची क्लर्क पदावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यलयात नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी त्याची प्रकृती अचानक बिघडली. परंतु कोरोनाची दहशत असल्याने त्याला कोणी हातही लावला नाही. त्यात पालिका मुख्यालयाखाली रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे या क्लर्कला रुग्णालयात घेऊन जाण्यास उशीर झाला.
कोरोनाचा संशय असल्याने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्या कामगाराला हदविकाराचा झटका येऊन गेला होता. उपचार मिळेपर्यंत दुसरा मोठा झटका आला आणि बुधवारी संध्याकाळी नायर रुग्णालयात त्या कामगाराचा मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यावर या क्लर्कची कोरोना टेस्ट करण्यात आली. असता अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे या कामगाराच्या मृत्यूस पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.
पालिका मुख्यालयापासून सेंट जॉर्ज, कामा, बॉम्बे रुग्णालय जवळ असताना नायर रुग्णालयात घेऊन जाण्याची गरज काय. असा प्रश्न उपस्थित करत या क्लर्कच्या मृत्यूस पालिकेचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यावर उपचार करण्यासाठी जवळील रुग्णालयांची निवड करण्यात यावी, अशी सूचना आयुक्तांना करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.