मुंबई: बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतीक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या सिग्नल जवळ ऑटो रिक्षाने प्रवास करीत असलेल्या एका महिलेचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी जुहू पोलीसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध घेऊन त्याला 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपीचे नाव अरविंद वाघेला वय वर्ष 47 असे आहे. तो फेरीवाला असून विलेपार्ले पश्चिम येथील एका चाळीत राहतो.
जुहू पोलीस ठाण्याच्या परीसरात ही विनयभंगाची घटना घडली. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून जुहू पोलीस ठाण्यात या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि कोणताही पुरावा उपलब्द नसताना ही आरोपीला 24 तासांच्या आत म्हणजेच गुन्हा दाखल झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास अटक केली.
जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या ऑटोरिक्षाने प्रवास करीत होत्या. त्यांची रिक्षा बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतीक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या सिग्नल जवळ आली असता असताना ऑटो मध्ये एका अनोळखी इसमाने त्यांचा विनयभंग केला. या संबंधाची तक्रार त्यांनी केली. त्या नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. हा गुन्हा घडला ती वेळ रात्रीची असल्याने तसेच गुन्हयामधील तक्रारदार या आरोपीतास ओळखत नसल्याने तसेच आरोपी बाबत काहीही माहिती नसल्याने या आरोपीताचा शोध घेणे थोडे कठीण काम होते.
परंतु या आरोपीस संशयावरुन ट्रॅक करत असताना जवळपास १० ते १५ खाजगी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. या गुन्हयातील तक्रारदार यांनी सांगितलेल्या आरोपीच्या वर्णनावरून एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या वर्णनाप्रमाणे एक अनोळखी व्यक्ती पोलीसांच्या नजरेस पडला. या आरोपीबाबत तक्रारदार व रिक्षाचालक यांच्याकडे खात्री करण्यात आली. परंतु तरी देखील आरोपीच्या पेहरावा वरून फिरस्ता असल्यासारखे वाटत असल्याने त्याचा शोध घेणे कठीण होते.
या आरोपीताच्या प्राप्त सीसीटीव्ही फुटेजवरून कसुन शोध घेतला असता आरोपी सेंट जोसेफ चर्च परिसरामध्ये फेरीवाल्याचे काम करीत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. तात्काळ पोलिसांनी सेंट जोसेफ चर्च परिसरात जाऊन त्याचा कसून शोध घेतला असता सीसीटीव्ही फुटेजमधील फोटोप्रमाणे पाहिजे आरोपी पोलीसांच्या जाळ्यात आला. नंतर त्याला ताब्यात घेवुन चौकशी केली असता आरोपीने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याला दाखल गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे.