मुंबई - लालबाग गणेशगल्ली येथील साराभाई इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लग्नाच्या घरात जेवण बनवले जात असताना सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले होते. त्यामधील 10 जणांची प्रकृती गंभीर होती. काल रात्री केईएम रुग्णालयात सुशीला बागरे (62 वर्ष) या महिलेचा मृत्यू झाला असून सध्या 9 जणांची प्रकृती गंभीर आहे.
काय घडले होते -
लालबाग गणेश गल्ली येथे सुप्रसिद्ध अशी साराभाई इमारत आहे. तळ मजला अधिक चार मजले अशी या इमारतीचे बांधकाम आहे. याच विभागात मुंबईमधील सुप्रसिद्ध असा गणेशगल्ली गणेशोत्सव साजरा केला जातो. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी 7 वाजून 23 मिनिटांनी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या घरात रात्रीपासून गॅस गळातीचा वास येत होता. सकाळी लग्नापूर्वी हळदीचे जेवण बनवण्यासाठी कामगार आणि लग्न घरातील काही लोक आले, त्यांनी गॅस पेटवल्यावर स्फोट होऊन आग लागली. इमारतीमधील काही घरांचे नुकसानही झाले. या दुर्घटनेत इमारतीमधील 16 रहिवाशी भाजले आहेत. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन 7 वाजून 50 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये भाजलेल्या जखमींना जवळच्या केईम रुग्णलयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 12 जणांना केईएम रुग्णालयात तर 4 जणांना परेलच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. केईएममध्ये 6 रुग्ण 70 ते 80 टक्के भाजल्याने तर मसिना मधील 4 जण 70 ते 90 टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर 6 जण ३० ते ५० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती काल रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. केईएम रुग्णालयात प्रकृती गंभीर असलेल्यापैकी सुशीला बागरे (62 वर्ष) या महिलेचा काल रात्री मृत्यू झाला आहे. सध्या केईएम रुग्णालयात 5 व मसिना रुग्णालयात 4 अशा एकूण 9 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
महापौरांची भेट -
केईएम रुग्णालयातील जखमींची विचारपूस केल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला सुद्धा भेट दिली. ज्यांच्या घरी गॅस दुर्घटना झाली आहे त्यांच्याकडे लग्न विधी सुरू होते. अचानक गॅस लिकेज होत असल्याचे कळल्यानंतर घरातील सर्वांनी त्याकडे धाव घेतली असता गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये सोळा जण जखमी झाले असून बारा जणांना केईएम रुग्णालयात तर ७० ते ९५ टक्के भाजले असल्याने त्यांना मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले. केईएममध्ये युद्धपातळीवर सर्व जखमींवर उपचार सुरू असून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू न देता औषध उपचार करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच गॅस दुर्घटनेतील कुटुंबियांची राहण्याची व्यवस्था लगतच्या हॉटेलमध्ये करण्यात आली असून क्षतीग्रस्त झालेल्या घराची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.
जखमींची प्रकृती स्थिर -
केईएम रुग्णालयात 12 जखमी उपचार घेत आहेत. यामध्ये विनायक शिंदे (85 वर्ष), ओम शिंदे (20 वर्ष), यश राणे (19 वर्षे), करीम (45 वर्ष), मिहीर चव्हाण (20 वर्ष), ममता मुंगे (48 वर्ष) हे सर्व जण 30 ते 50 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे
प्रकृती गंभीर -
तसेच प्रथमेश मुंगे (27 वर्ष), रोशन अंधारी (40 वर्ष), मंगेश राणे (61 वर्ष), महेश मुंगे (56 वर्ष), ज्ञानदेव सावंत (85 वर्ष) हे सर्व 70 ते 80 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
मसिना हॉस्पिटलमध्ये 4 जखमी उपचार घयाेत आहेत. यामध्ये वैशाली हिमांशू (44 वर्ष), त्रिशा (13 वर्ष), बिपीन (50 वर्ष) सूर्यकांत (60 वर्ष) हे सर्व 70 ते 95 टक्के भाजले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.