मुंबई - मुंबई विद्यापीठाचे विविध विभाग, पीएचडी केंद्रामधील गाईडनिहाय रिक्त जागांची माहितीच विद्यापीठाकडून उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. यामुळे पीएचडी प्रवेश घेण्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पीएचडी केंद्रांमध्ये विविध आरक्षण आणि शुल्कामध्ये एकसमानता नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे पीएचडी केंद्रामधील गाईडनिहाय रिक्त जागांची माहितीच विद्यार्थ्यांना तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना विद्यापीठाने सर्व महाविद्यालये, संस्था, सेंटर आणि विद्यापीठातील विभागांना तत्काळ द्याव्यात. अन्यथा लोकशाही मार्गाने आणि कोविडच्या नियमांचे पालन करून आंदोलन करू, असा इशारा आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप रणदिवे यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नवीन नियमानुसार विद्यापीठीय नियुक्तीमध्ये पीएचडी बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच विद्यापीठामध्ये लेक्चरर, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू होण्यासाठी पीएचडी आवश्यक झाली आहे. परिणामी पीएचडी करण्याकडे ओघ वाढला आहे. मात्र, पीएचडी करणार्या विद्यार्थ्यांना पीएचडीच्या विषयाच्या गाईडकडे असलेल्या रिक्त जागांबाबत माहितीच मिळत नाही. तसेच विभाग किंवा पीएचडी केंद्रांकडे याबाबत विद्यार्थ्यांकडून विचारणा केल्यावरही त्यांना कोणतेही उत्तर मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
4 हजार 304 विद्यार्थी उत्तीर्ण
मुंबई विद्यापीठाने दोन वर्षांने पेटची परीक्षा घेतल्याने यंदा पीएचडी प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. गेल्या दोन वर्षात पेट परीक्षेला 7 हजार 706 विद्यार्थी बसले होते. यातील 4 हजार 304 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले आहे. मात्र, या संकेतस्थळावर विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात असलेल्या पीएचडी केंद्रावर कोणत्या विषयाच्या व कोणत्या गाईडकडे किती जागा आहेत, याची माहितीच प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी समोर जावे लागत आहे
... नाहीत तर आंदोलन करू
दिलीप रणदिवे म्हणाले, विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधील पीएचडी केंद्रांमध्ये विविध आरक्षणांतर्गत असणार्या जागांची माहितीही दिली जात नाही. पीएचडीसाठी प्रत्येक डिपार्टमेंटची वेगवेगळी फी स्ट्रक्चर आहे. सोशल सायन्स, ह्युमॅनिटी अॅण्ड प्युअर सायन्स यासारख्या विषयांसाठी विद्यापीठाचे विविध विभाग आणि पीएचडी केंद्रांकडून आकारण्यात येणार्या शुल्कामध्ये एकसमानता नाही. त्यामुळे पीएचडीची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आणि कोविडच्या नियमांचे पालन करून आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप रणदिवे यांनी दिला आहे.
हेही वाचा - दहिसर चेक नाक्यावर आमदार मनीषा चौधरींचे आंदोलन