मुंबई - कोरोना संसर्ग रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईकरांच्या मनामध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्वत्र सध्या निर्जंतुकीकरण व ज्या ठिकाणी रूग्ण आढळले आहेत असे भाग सील करण्यात आले आहेत. मात्र, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करणारे कामगार विषाणूच्या भीतीने कामावर येत नसल्याने विक्रोळी पार्क साईट येथील शिव छाया व शांतिदूत सोसायटीच्या युवकांनी आज एकत्र येत सार्वजनिक शौचालय निर्जंतुकीकरण व स्वच्छता करून कोरोनाशी लढण्याचा संकल्प केला.
मुंबई ही गरिबी आणि श्रीमंती तसेच झोपडपट्टी व उंच आकाशाला भिडणाऱ्या इमारतीची मुंबई अशी जगभर ओळख आहे. या मुंबईमध्ये लोकसंख्या घनता मोठ्या प्रमाणात असून देशातील विविध राज्यांच्या कानाकोपर्यातून कामाच्या शोधात कामगार येथे आपल्या उदरनिर्वाहाकरिता येतात. याच मुंबईवर सध्या कोव्हिड-१९ या साथ रोगाचे संकट उभे राहिले आहे. 24 तास धावणारी मुंबई अशी मुंबईची ओळख आहे. मात्र, सध्या या विषाणूच्या वाढत्या प्रसाराने मुंबई ठप्प आहे.
मुंबई उपनगरातील विक्रोळी पार्क साईट हा भाग डोंगरावर मोठ्या प्रमाणात वसला असून याठिकाणी अनेक झोपड्या चढ उतारावर आहेत. येथील शांतीदूत व शिव छाया सोसायटीतील 120 कुटुंबांसाठी पुरुषांचे 4 आसनी सार्वजनिक शौचालय असून महिलांसाठी वेगळे आहे. कोरोना विषाणूच्या भीतीने या शौचालयांची स्वछता करणारा कामगार गेल्या काही दिवसांपासून येत नसल्याने यात मोठ्या प्रमाणावर घाण झाली होती. काही दिवसापूर्वी स्थानिक पुढाऱ्यांनी निर्जंतुकीकरण केले होते मात्र झोपडपट्टी भागांमध्ये इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या परिसरामध्ये प्रशासन कितीवेळ निर्जंतुकीकरण करणार त्यामुळे युवकांनी एकत्र येत आता आपली सुरक्षा आपल्याच हाती यानुसार सोशल डिस्टन्स पाळत स्वच्छता केली असल्याचे स्थानिक रहिवाशी आनंद मोहन सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
पार्क साईट हा विभाग झोपडपट्टी व डोंगराच्या उतारावर असल्याने येथील कामगारांना एकच प्रश्न पडलेला आहे. कोरोनाचे संकट कधी एकदाचे संपुष्टात येईल हाच प्रश्न त्यांना आता सतावत आहे. लवकरात लवकर सर्व सुरळीत व्हावे याकरिता आपणही आपल्या परिसर व घराची स्वच्छता करण्यासाठी युवक पुढे येत असल्याचे दिसत आहे.