मुंबई- देशात कोरोना विषाणूने आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून देश आणि राज्यपातळीवरील विविध यंत्रणांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. लोकांनी एकत्र येऊ नये, यासाठी विविध कायदे अंमलात आणण्यात आली आहेत. मात्र, या कायद्यांची पायमल्ली होताना दिसून आले आहे. कामोठ्यात कोरोना संशयित कुटुंब सर्रासपणे शहरात फिरताना दिसून आले. त्यामुळे, या कुटुंबावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून राज्यात येणाऱ्या नागरिकांची तपासणी होत असून त्यांना व त्यांच्या कुटुंबांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याची ताकीद शासनाकडून दिली जात आहे. मात्र, या बाबीचा सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. कामोठ येथील एका कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे, या रुग्णाच्या कुटुंबाचे विलगीकरण करण्यात आले होते. मात्र, हे कुटुंब शासनाच्या आदेशांना धाब्यावर बसवून शहर परिसरात फिरताना दिसून आले.
पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, प्रांत अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या पहाणीत हे कुटुंब घरीच आढळले होते. मात्र, नंतर हे कुटुंब मागील दोन दिवसांपासून परिसरात फिरत असून ते त्यांच्या दुकानातही जात असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर कुटुंबातील ३ सदस्यांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. सद्यास्थितीत कुटुंबातील तिघा सदस्यांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यासाठी घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा- मुंबई, पुणे, नागपूरमध्ये आजपासून सक्तीची बंदी; रस्त्यांवर शुकशुकाट