मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजच्या तुडवडा आहे. राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आता परिवहन विभागानेसुद्धा नायट्रोजन- आरगॉन वाहतुकीचे ५० टक्के टँकरचे रूपांतर ऑक्सिजनमध्ये करण्याचे आदेश दिले आहे. परिवहन विभागाने आत्तापर्यंत ४९ टँकर्सचे रुपांतर केले आहेत. आणखी ४१ टँकर्स ऑक्सिजनसाठी वापरण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी ईटीव्ही भारताला दिली.
२४ तासांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश
कोरोना रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, म्हणून शासनाने राज्यातील ५० टक्के नायट्रोजन व आरगॉन टँकरचे रुपांतर ऑक्सिजनमध्ये करण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत. तसेच माल वाहतुकदारांच्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केंद्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नायट्रोजन व आरगॉन टँकर्स ऑक्सिजनसाठी वापरण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार राज्य शासनाने तातडीने ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी परिवहन विभागावर जबाबदारी सोपवली आहे. नायट्रोजन व आरगॉन टँकर्सचे रुपांतर ऑक्सिजन टँकर्समध्ये करण्याची प्रक्रिया वेगाने पार पाडण्यासाठी प्रत्येक टँकरमागे एक मोटर वाहन निरीक्षक व एक सहायक मोटर वाहन निरीक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अवघ्या २४ तासांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले होते.
४९ टँकर्सचे रुपांतर
राज्यात आरगॉन वायुची वाहतूक करण्यासाठी ६७, तर नायट्रोजन वायुच्या वाहतुकीसाठी १३८ टँकर्स धावतात. याशिवाय ऑक्सिजन वायुची वाहतूक करणारे १८३ टँकर्स आहेत. शासनाच्या आदेशानुसार आत्तापर्यंत आरगॉन व नायट्रोजन वायुची वाहतूक करणाऱ्या ४९ टँकर्सचे रुपांतर ऑक्सिजन टँकर्समध्ये केले आहे. याशिवाय आणखी ४१ टँकर्सचे रुपांतर ऑक्सिजन वायु वाहतुकीसाठी करता येईल. त्यामुळे राज्यातील ऑक्सिजन पुरवठ्यात मोठी भर पडेल.