मुंबई - बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून विमा पॉलिसी विकलेल्या ९ जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. टोळीतील सहभागी सदस्य ग्राहकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून इन्शुरन्स एजंट असल्याचे भासवत होते. मुंबई पोलिसांच्या ताडदेव पोलिसांनी दिल्ली, फरीदाबाद व हरियाणा या ठिकाणी छापा मारून ही कारवाई केली.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ताडदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये इन्शुरन्स एजंट असल्याचे भासवत होते. तसेच मोबाईल फोनद्वारे बंद पडलेली इन्शुरन्स पॉलिसी पुन्हा सुरू केल्यास डबल बोनस मिळेल, असे आमिष दाखवत होते. यासाठी आयडीबीआय बँक, कॉर्पोरेशन बँक सारख्या विविध बँकांमध्ये विम्याचे पैसे ट्रान्सफर केल्यानंतर ही पॉलिसी डबल बोनस सह पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही आरोपींकडून सांगितले जात होते. इन्शुरन्स पॉलिसीत दुप्पट बोनस मिळेल म्हणून काही तक्रारदारांनी पैसे बँकेत ट्रान्सफर केले. मात्र, त्यांना इन्शुरन्स पॉलिसीचे सर्टिफिकेट मिळाले नाही. यामुळे त्यांनी यासंदर्भात ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा - ६०० लोकवस्ती असलेल्या गावाने राबवला प्लास्टिक मुक्तीचा यशस्वी प्रयोग
या प्रकरणी पोलिसांच्या तांत्रिक तपासादरम्यान अशा प्रकारची टोळी दिल्ली फरीदाबाद, हरियाणा या ठिकाणी सक्रिय असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी दिल्ली, हरियाणा, फरिदाबाद या ठिकाणी छापा मारून 9 जणांना अटक केली आहे. आतापर्यंत या टोळीने शेकडो जणांना लाखो रुपयांचा गंडा घातलेला आहे. राजन सुनील कुमार गर्ग (31), रॉबिन मॅथ्यू जेमस (28), विशाल अश्विनी चौधरी (24), विकी विजय धवण (29), राजन रमेश वर्मा (31), दिलीप राजेंद्र सिंग (28), जितेंद्र राम प्रकाश सिंग (29), जगदीश सोनी (33), रुपेश आनंद राजपूत (29) अशी आरोपींची नावे आहेत.