मुंबई- पॉर्न फिल्म चित्रीकरण संदर्भात मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलकडून आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली होती, यानंतर दिपांकर कासवनीस उर्फ शान बॅनर्जी व तनवीर हाश्मी या दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत या गुन्ह्यांमध्ये ९ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
कंपनीचा संचालक शान बॅनर्जी
दीपांकर कासवनीस उर्फ शान बॅनर्जी हा पेशाने फोटोग्राफर आहे. याबरोबरच ज्या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न फिल्म शूट केली जात होती त्या कंपनीचा संचालकसुद्धा असल्याचं समोर आलेले आहे. या अगोदर अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री गहना वशिष्ठ व उमेश कामत या दोघांच्या दरम्यान बँकेच्या माध्यमातून काही आर्थिक व्यवहार झाले होते. उमेश कामत यांच्या एका बँक खात्यात व गहना वशिष्ठ हिच्या दोन बँक खात्यामध्ये परदेशातून हजारो डॉलर आले असल्याचा पोलिसांचा दावा आहे. हे पैसे आल्यानंतर त्याचे वाटप केले जात असल्याचेही समोर आले आहे.
नवव्या आरोपीला सुरतहून अटक
या प्रकरणामध्ये नववा आरोपी तनवीर हाश्मी याला गुजरातमधील सुरत येथून अटक करण्यात आलेली आहे. पॉर्न फिल्म चित्रीकरण संदर्भात एका पीडित महिलेने मालवणी पोलीस ठाण्यांमध्ये आणखीन एक गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात तनवीर हाश्मी याला सुरत येथून अटक केली आहे.