मुंबई - शहरातील धारावी झोपडपट्टीतील शेषवाडी परिसरात घर कोसळल्याची घटना घडली. यामध्ये ८ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे.
शेषवाडी येथे न्यू नेलको ट्रान्सपोर्ट शेजारी असणाऱ्या झोपडपट्टी मध्ये २ मजली घर होते. आज दुपारच्या सुमारास ते अचानक कोसळले. यामध्ये मोहम्मद रफिक (२२ वर्ष), जहान आरा खान (४० वर्ष), मोहम्मद रिझवान शेख ( १५ वर्ष), मोहम्मद राहजीत (२२ वर्ष), पप्पू यादव (२२ वर्ष), नवल राय (२४ वर्ष), रश्मी खान (५ वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली आहे.
धारावी ही अशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या वस्तीत अनेक अनधिकृत बांधकाम केलेली आहेत. मात्र, अनधिकृत बांधकामावर पालिका प्रशासन कारवाई करीत नाही. त्यामुळे अशा दुर्घटनेत लोकांचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.