मुंबई - मुंबईतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे वुहानच्या धर्तीवर देशातील पहिले नॉन क्रिटिकल कोविड रुग्णालय बांधण्यात येत आहे. या रुग्णालयाचे 70 बांधकाम (सिव्हिल वर्क) पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यानुसार पुढील काम पुर्ण करत येत्या 10 ते 12 दिवसांत रुग्णालय सेवेत दाखल होईल असेही त्यांनी सांगितले आहे.
दिवसेंदिवस मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत असून मे अखेर हा आकडा 50 हजाराच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्याच्या परिस्थितीतच रुग्णांना बेड मिळत नसून आरोग्य यंत्रणावरील ताण वाढला आहे. तेव्हा येणाऱ्या दिवसात हा ताण आणखी वाढू नये यासाठी बीकेसीत वुहानच्या धर्तीवर कोविड रुग्णालय बांधण्यात येत आहे. 1 हजार 8 खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये नॉन क्रिटिकल रुग्ण दाखल केले जाणार आहेत. त्यानुसार एमएमआरडीएने आठवड्याभरापूर्वी या रुग्णालयाच्या कामाला सुरुवात केली आहे.
युद्धपातळीवर हे काम सुरू असून आतापर्यंत 70 टक्के सिव्हिल वर्क पूर्ण करण्यात आले आहे. तीन-चार दिवसांत उर्वरित बांधकाम पूर्ण करत इतर काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे आणखी 10 ते 12 दिवसात रुग्णालय सज्ज होईल असे ही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
1.25 लाख फूट जागेवर हे रुग्णालय बांधण्यात येत असून 40 मीटर रूंद आणि 240 मीटर लांब एवढा याचा आकार आहे. 1008 पैकी 50 टक्के म्हणजेच 504 खाटांना ऑक्सिजन पुरवठा असेल तर या रुग्णालयाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएला ज्युपिटर हॉस्पिटलची मदत मिळत आहे.