मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील उच्चभ्रू मतदारसंघ अशी ओळख असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात या निवडणुकीत तब्बल ६२ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यात कुलाबा, मलबार हिल आणि कफ परेड या विभागांचा समावेश आहे.
एकंदर मुंबईमधून एम.एम.आर.डी.ए परिसरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. दक्षिण मुंबईमधून अनेकांनी स्थलांतर केले आहे. तसेच अनेक मतदारांचा मृत्यू झाल्यानंतरही ही नावे मतदार यादीत कायम होती. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यलयाने निवडणुकीच्या कार्यक्रमासंदर्भात मे, जून आणि जुलै महिन्यात घेतलेल्या आढाव्यात ही माहिती समोर आल्याचे उप जिल्हाधिकारी आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती ज्या मलबार हिल भागात राहतात त्या क्षेत्रात १० हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तर कुलाबा विधानसभा क्षेत्रात नेव्हीनगर ही नौदलाची मोठी वसाहत आहे. या वसाहतीतून ५ हजार पाचशे मतदार वगळण्यात आले आहेत. नौसेनेतून वारंवार नौसैनिकांच्या बदल्या भारतातल्या इतर भागात होत असतात. त्यामुळे बदली झालेल्यांची नावेही यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.
भारतीय निवडणूक आयोग गेल्या वर्षभरापासून मतदार नोंदणी मोहीम राबवत आहे. मतदार यादीत आपले नाव आहे की, नाही याची माहिती घेण्यासाठी आयोगाने १९५० ही हेल्पलाईन सुरू केली आहे. या शिवाय "गो व्हेरी फाय" ही मोहीम ही राबवण्यात येत असल्याची माहिती शहर उप जिल्हा निवडणूक अधिकारी मुकादम यांनी दिली.