मुंबई : वाढत्या उष्माघातामुळे मुंबई पोलिस सावध झाले असून वाहतूक पोलिसांसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना मुंबई देखील उन्हाचा उच्चांक गाठत आहे. अशा वाढत्या उष्म्यात वाहतूक पोलीस रणरणत्या उन्हात भर रस्त्यात आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाहतूक पोलिस सावध झाले आहेत. 55 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय आणि आजारपण असलेल्या पोलिसांना दुपारी 12 ते सायंकाळी पाच या वेळेत भर उन्हात ड्युटी न देता त्यांना कार्यालयीन काम दिले जाणार आहे.
मुंबई पोलीस सतर्क : ज्या वाहतूक पोलिसाचे वय 55 किंवा त्यापेक्षा अधिक आहे. तसेच दमा, रक्तदाब, मधुमेह असलेल्या पोलिसांना दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत उन्हात ड्युटी न देता त्यांना कार्यालयीन काम दिले जाणार आहे. मुंबईत प्रचंड उन्हामुळे सामान्यांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत वाहनांची कोंडी थांबवण्यासाठी वाहतूक पोलिस भर उन्हात उघड्या आभाळाखाली उभे राहून वाहतुकीचे नियमन करतात. पोलिसांना उष्माघाताचा फटका बसू नये, त्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. तसेच यासाठी वाहतूक विभागाचे पोलिस सहआयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यात महत्त्वाची म्हणजे 55 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या पोलिसांना, त्याचप्रमाणे दमा, रक्तदाब, मधुमेह, इतर दुर्धर आजार असलेल्या पोलिसांना उन्हात काम देऊन नये. अशा पोलिसांना कार्यालयीन काम द्यावे, असे या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
अशी केली व्यवस्था : मार्गदर्शक सूचनांमध्ये इतर महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. वाहतुकीच्या नियमनासाठी तरुण, सशक्त पोलिसांची नियुक्ती करणे, एका ठिकाणी जोडीने पोलिसांची किंवा सोबत वॉर्डची नेमणूक करावी, दुपारच्या वेळेस कर्तव्याच्या ठिकाणी स्वच्छ पाण्याच्या बाटलीची व्यवस्था करणे, उन्हाची दाहकता असल्याने प्रत्येकाने न चुकता टोपी घालावी, छातीत दुखणे, चक्कर आल्यास तत्काळ जवळच्या रुग्णालयात जावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्तव्यावरील पोलिसांची नियमित माहिती घ्यावी अशा सूचना देखील वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांनी दिल्या आहेत.