मुंबई - विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश -
उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी, असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहभावना असतील. तसेच, जखमी रुग्ण लवकर बरे व्हावेत असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
काय घडली दुर्घटना?
नाशिकमधील ऑक्सिजन लीकची दुर्दैवी घटना ताजी असतानाच, विरारमध्ये एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही दुर्घटना घडली. रात्री तीनच्या सुमारास रुग्णालयाच्या आयसीयू विभागामध्ये ही आग लागली होती. याठिकाणी १७ रुग्णांवर उपचार सुरू होते. यांपैकी १३ रुग्ण दगावल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक दिलीप शहा यांनी दिली आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, अतिदक्षता विभागातील एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.