मुंबई - दादर पश्चिम येथील क्रांतीसिंह नाना पाटील मंडईत पायाने गाजर धुतले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोमवारी १२ ऑगस्टला हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओतून मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचे लक्षात येताच पालिकेसह अन्न व औषध प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. या मंडईतील पाच गाळे धारकांना नोटीस बजावत एकावर दंड ठोठवण्यात आला आहे.
काही महिन्यापूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकात एका सरबत विक्रेत्याने सरबतमध्ये हात पाय धुतले होते. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर त्या स्टॉल विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असातनाच एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दादर येथील पालिकेच्या क्रांती सिंह पाटील मंडईमध्ये एका व्यक्ती ड्रममधील गाजरांना पायाने धुवत असल्याचे दिसत आहे. या व्यक्तीला दुसरा व्यक्ती हाताने गाजर धुण्यास सांगत आहे. त्यावर आपण किती गाजर हाताने धुवायची. तुम्ही माती लागलेले गाजर खाणार का? असा उलट प्रश्न या गाजर धुणाऱ्याने विचारला आहे.
हा व्हिडीओ ईदच्या दिवशीचा असल्याने त्या दिवशी पालिकेचे अधिकारी विशेष कामासाठी नेमण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी (१३ ऑगस्टला) पालिकेचे बाजार विभागाचे अधिकारी या मंडईत गेले. त्यांनी गाळा क्रमांक ८९, ८७, ८१, ८३ यांना नोटीस बजावली. तसेच अस्वच्छता पसरवल्याबाबत त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर १४ ऑगस्टला देखील पुन्हा याच ठिकाणी जाऊन ४७, ६०, ५५, ६६, १२९, १७३, १८६ या सात गाळेधारकांकडून अस्वच्छता पसरवल्याबाबत प्रत्येकी एक हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. त्यांना पालिकेडून नोटीसही बजावण्यात आली आहे. तसेच गाजर धुण्याचे १९ ड्रम आणि एका छोटा ड्रम जप्त केले आहेत.
मंडईतील गाळे धारक प्रमुखांची बैठक
त्यानंतर क्रांतीसिंह नाना पाटील मंडईतील गाळेधारक अस्वच्छता पसरवत आहे. तसेच ते मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळत असल्याने एफडीएने आधी त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर पालिकेने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या घटनेच्या पारश्वभूमीवर सदरील मंडईसह अन्य मंडईतील गाळे धारक प्रमुखांची बैठक घेण्यात आली होती. अस्वच्छता पसरवू नये, खाद्य पदार्थांची योग्य काळजी घ्यावी, मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळू नये, असा इशारा बैठकीत देण्यात आला. एफडीएची ही कारवाई क्रांतीसिंह नाना पाटील मंडईपर्यंतच मर्यादीत नसून त्यांच्याकडून मुंबईतील बहुतांश मंडईतील स्वच्छतेची पहाणी करण्यात येत आहे. तसेच मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्याविरोधात एफडीएची कारवाई सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.