मुंबई - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने २ एप्रिलपर्यंत २४ लाख ३७ हजार ९१८ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत एकूण ४९ कोटी १५ लाख ४६ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी मुंबई पोलिसांकडून ४ कोटी ८८ लाख ७० हजार ४०० रुपये तर रेल्वेमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ४४ लाख २४ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
४९ कोटी १५ लाखांचा दंड -
मुंबईमध्ये मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार होऊ लागला. हा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने मास्कची सक्ती केली. मास्क लावला नसल्यास सुरुवातीला १ हजार रुपये दंड वसूल करण्यात येत होता. पुढे हा दंड कमी करून २०० रुपये इतका करण्यात आला. २० एप्रिल २०२० पासून २ एप्रिलपर्यंत ३६७ दिवसात २४ लाख ३७ हजार ९१८ नागरिकांवर कारवाई करत ४९ कोटी १५ लाख ४६ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्यासाठी विभागवार क्लिन अप मार्शलची नियुक्ती केली आहे. तसेच पोलिसांकडूनही विनामास्क नागरिकांवर कारवाई केली जात आहेत. पोलिसांकडून जो दंड वसूल केला जातो त्यामधील ५० टक्के दंडाची रक्कम पोलिसांना तर ५० टक्के दंडाची रक्कम पालिकेला दिली जाते.
पालिका पोलिसांकडून दंड वसुली -
बृहन्मुंबई महानगरपालिकेने २१ लाख ७३ हजार १०८ लोकांवर कारवाई करत ४३ कोटी ८२ लाख ५१ हजार ८०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी २ लाख ४३ हजार ९९२ नागरिकांवर कारवाई करत ४ कोटी ८८ लाख ७० हजार ४०० रुपये दंड वसुली केली आहे. तर उपनगरीय रेल्वे मध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या २० हजार ८१८ प्रवाशांवर कारवाई करत आतापर्यंत ४४ लाख २४ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हवरून आव्हाड, फडणवीसांमध्ये ट्विटर वॉर
हेही वाचा - मुंबईत शनिवारी 64 हजार 186 लाभार्थ्यांचे लसीकरण