मुंबई - मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे रुग्णांना बेड मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. मुंबईतील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाही, अशी ओरड रुग्णांकडून होत आहे. मुलुंड जम्बो कोविड सेंटरमध्ये काय परिस्थिती आहे? याचा आढावा 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने घेतला.
हेही वाचा - रिलायन्सच्या जामनगर प्लांटमधून महाराष्ट्राला मिळणार ऑक्सिजन
मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता जाणवत आहे. मुलुंड जम्बो कोविड सेंटरमध्ये ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने केलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये या सेंटरमध्ये सध्या तरी सर्व व्यवस्था बरोबर असून, खाटा देखील रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
450 खाटा रिक्त
धारावी नंतर मुलुंड हा विभाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. खबरदारी लक्षात घेता प्रशासनाने अगोदरच चांगले उपाय राबविल्यामुळे येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र दिसत आहे. या सेंटरमध्ये एकूण 1 हजार 650 खाटा आहेत. त्यातील 450 खाटा रिकाम्या आहेत. तसेच, 700 ऑक्सिजन खाटा आहेत. 20 व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध आहेत, असे कोविड सेंटरचे प्रमुख प्रदीप आंग्रे यांनी सांगितले.
मुलुंडमधील रुग्णांना प्रथम प्राधान्य
मुलुंड जम्बो कोविड सेंटरमध्ये ठाण्यामधून देखील रुग्ण येऊ लागले होते, यामुळे या सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात ताण पडत होता. यानंतर आता फक्त मुलुंड आणि आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना सेंटरमध्ये घेतले जात आहे.
ऑक्सिजन सेवा सुरळीत
महाराष्ट्रात एकीकडे ऑक्सिजन बेड नसल्याचे चित्र दिसून आले होते. मुलुंडमधील या सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड देखील पुरेसा आहेत, अशी माहिती या सेंटरचे प्रमुख आंग्रे यांनी दिली.
मुलुंड कोविड सेंटरबद्दल थोडक्यात
मुंबई उपनगरातील मुलुंडमध्ये रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीच्या परिसरात मुबई महानगरपालिकेतर्फे 1 हजार 650 बेडची जम्बो कोविड केअर फॅसिलिटी तयार करण्यात आली आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे हे सेंटर आहे. यात तब्बल 500 हून जास्त ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी 26 हजार लिटर ऑक्सिजन बँकची व्यवस्था करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बेड असलेले हे पहिलेच सेंटर आहे. विशेष म्हणजे, हे कोविड केअर सेंटर संपूर्णपणे वातानुकूलित आहे. सेंटरमध्ये कॉन्टॅक्टलेस स्क्रिनिंग सेंटर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वेगळी मार्गिका, तसेच डेडिकेटेड वाय-फाय सुविधा देखील उपलब्ध आहे. सोबतच गरम आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता देखील या सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे.
हेही वाचा - मुंबईत कलम 144 ची अंमलबजावणी, वर्षभरात 60 हजारांहून अधिक जणांवर गुन्हे दाखल