मुंबई Western Express Highway : वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटकडून अहवाल मुंबई महानगरपालिकेकडे सोपविण्यात आला. या अहवालात डागडुजी आवश्यक असलेल्या 44 फ्लायओव्हर्स आणि भुयारी मार्गाची यादी असून या दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेला अंदाजे 200 कोटी रुपये निधी आवश्यक आहे.
देखभालीची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित : मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA ने नोव्हेंबर 2022 मध्ये सर्व पायाभूत सुविधांच्या देखभालीची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली होती. यामध्ये कोणताही बदल न करता पालिकेने सर्व पायाभूत सुविधांच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. या सर्व पायाभूत सुविधांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची जबाबदारी पालिकेने वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट या संस्थेला दिली.
अंधेरी उड्डाणपुलासाठी दुरुस्तीच्या पद्धती सुचविण्यात आल्या : वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट या संस्थेने एप्रिल 2023 मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टवर काम सुरू केले. त्यांनी दुरुस्तीच्या शिफारशी देण्यासाठी स्ट्रक्ट्रॉनिक्स कन्सल्टिंग इंजिनिअरिंगची नोंदणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी उड्डाणपुलासाठी दुरुस्तीच्या पद्धतीही सुचविण्यात आल्या असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसंच पारसी पंचायत सबवेचेही काम सुरू आहे.
पालिकेच्या निधीतून दुरुस्ती केली जाणार : महापालिकेच्या मालमत्तांचा अंदाजपत्रकात समावेश नसल्याने दुरुस्तीसाठी पालिकेच्या निधीतून निधी दिला जाणार आहे. सरकार आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या प्रतिपूर्तीसाठी एक खातेवहीदेखील ठेवली जाईल. गेल्या महिन्यातच पालिकेने वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कल्व्हर्ट, फूट ओव्हर ब्रिज आणि फ्लायओव्हर्सचे ऑडिट करणार असल्याचे जाहीर केले होते. या ऑडिटसाठी 90 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. दरम्यान, पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुमारे साठ उड्डाणपूल, कल्व्हर्ट आणि एफओबी आहेत. पालिकेने पश्चिम महामार्गावरील काही महत्त्वाचे चौक मोकळे करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये विलेपार्ले, दहिसर आणि अंधेरी येथील मिलन सबवे जंक्शन तसंच हनुमान रोड आणि सुधीर फडके फ्लायओव्हर्सचा समावेश आहे.
एल्फिन्स्टन रोड पूल दुर्घटना : परेल आणि एल्फिन्स्टन स्टेशनला जोडणारा मुंबईतील पादचारी रेल्वे पुलावर 29 सप्टेंबर 2017 ला घडलेली दुर्घटना ही अक्षरश: मन सुन्न करणारी होती. या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 23 लोकांनी आपले प्राण गमावले, तर 38 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी सातत्याने पुलांचे सर्व्हे केले जातात. तसंच सर्व्हेच्या अहवालानुसार पुलांचं दुरुस्ती काम केलं जातं. मात्र, माहिती मिळून सुद्धा त्यावर काहीच करण्यात आलं नाही तर मोठ-मोठे अपघात घडू शकतात.
हेही वाचा -