नवी मुंबई - नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यावरुन चार तरुणी वाहून गेल्या आहेत. यापैकी 3 मुलींचे मृतदेह सापडले असून अद्यापही 1 तरुणी बेपत्ता आहे. सर्व तरुणी चेंबूर मधल्या असल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाकडून बेपत्ता तरुणींचा शोध घेण्यात येत आहे. पांडवकडा भागात जाण्यास बंदी असूनही नियमांचे उल्लंघन करुन पर्यटक त्यांचा जीव धोक्यात घालत असल्याचे या घटनेनंतर समोर आले आहे.
नवी मुंबईच्या नेरुळ येथील एसआयईएस कॉलेजमधील 7 जणांचा ग्रुप आज सकाळी खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर मौजमजेसाठी आला होता. यावेळी तेथील ओढय़ात सर्वजण उतरले. दरम्यान, सकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने धबधब्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे सर्व तरुण-तरुणी बाजूलाच असलेल्या धामोळ पाड्याच्या दिशेने वाहून गेले होते.
या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली. यामध्ये 3 तरुणींचे मृतदेह मिळाले असून नेहा अशोक जैन, आरती नायक, आणि श्वेता नंद (रा.ऐरोली), अशी मृतदेह सापडलेल्या तरूणींची नावे आहेत. तर नेहा दामा (रा. कोपरखैरणे) या मुलीचा शोध घेण्यात येत असल्याचे खारघर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी सांगितले.