मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या आणि हजारो नागरिकांचे बळी घेतलेल्या कोरोना व्हायरसचे आतापर्यंत मुंबईत एकूण 9 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 5 रुग्ण आधीचे असून शनिवारी 4 रुग्ण आढळले आहेत. एकूण 9 रुग्णांपैकी 5 रुग्ण मुंबईमधील आहेत. तर ठाणे, कल्याण, वाशी, कामोठे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या रुग्णांनी परदेशात प्रवास केला होता. त्यांना मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे उप-मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी सांगितले आहे.
मुंबईमध्ये शुक्रवारी रात्रीपर्यंत 5 कोरोनाचे रुग्ण होते. त्यात पुण्याच्या रुग्णाच्या सानिध्यात आलेले 2, हिंदुजा रुग्णालयातील 1, तर ठाण्यातील 1 रुग्ण होता. त्यानंतर शुक्रवारी रात्रीच हिंदुजामधील रुग्णाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तर शनिवारी मुंबईत आणखी 4 रुग्ण सापडले आहेत. त्यात हिंदुजामधील रुग्णाचा आणखी एका नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ठाणे, कल्याण, वाशी, कामोठे येथील प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. या सर्वांवर मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरु असल्याचे शाह यांनी सांगितले.
हिंदुजा रुग्णालयातील रुग्णाच्या इतर 8 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, त्या सर्व निगेटिव्ह आल्या आहेत. मुंबई बाहेरील सर्व रुग्णांची माहिती त्या-त्या जिल्ह्याच्या प्रशासनाला कळविण्यात आली आहे. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची व सहवासात आलेल्यांची माहिती गोळा केली जात असल्याचेही शाह यांनी सांगितले. हिंदुजा रुग्णालयातील रुग्णाच्या सहवासात आलेल्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची चाचणी केली असता, त्यांच्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.
- कोरोनाबात कारवाई -
18 जानेवारीपासून आतापर्यंत विमानतळावर 2,30,589 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत कस्तुरबा रुग्णालयात 320 प्रवाशांना दाखल केले आहे. त्यापैकी 9 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यात मुंबईचे 5 तर मुंबई बाहेरील 4 रुग्ण आहेत.
- कोरोनाबाबत जनजागृती -
मुंबई आणि मुंबई परिसरात कोरोनाचे 9 रुग्ण सापडल्यावर पालिकेने जनजागृती अभियान सुरु आहे. त्यात पालिकेच्या 24 वॉर्डमध्ये 667 जणांची टीम बनवण्यात आली होती. त्यांनी दिवसभरात 2912 सोसायटीमध्ये जाऊन कोरोनाचे पोस्टर लावून जनजागृती केली. तसेच देशाबाहेरून आलेल्या प्रवाशांची माहिती गोळा करण्यात आली. पालिकेच्या कीटकनाशक विभागाच्या 172 लोकांच्या टीमकडून धुराची फवारणी करण्यात आली आहे.
- संपर्कात असलेले प्रवाशी -
आजपासून गेल्या 14 दिवसांत बाहेरील देशात प्रवास केलेले 989 प्रवाशी मुंबईमधील आहेत. त्यापैकी 985 प्रवाशी पालिकेच्या संपर्कात आहेत. त्यापैकी 4 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या चाचण्या आता निगेटिव्ह आल्या आहेत. गेल्या 14 दिवसांत 270 प्रवाशांनी फॉलोअप पूर्ण केले आहे.
- सोशल मीडियावर अफवा पसरू नये -
व्हाट्सअप, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहेत. काही लोकांच्या फोटोसह हे कोरोनाचे रुग्ण असल्याचे मेसेज पसरवले जात आहेत. तसेच कोरोना व्हायरसबाबत इतर मेसेज पसरवून लोकांमध्ये भीती पसरवली जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्या लोकांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 54 नुसार त्वरित कारवाईचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यांना द्यावेत, अशी मागणी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.