मुंबई - बँकेकडून आलेला ओटीपी क्रमांक मिळवत लाखो रूपयांचा गंडा घालणाऱ्यांना रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने झारखंडमधून अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नवी मुंबईतील कळंबोली परिसरातून बिहारीमतो प्रसाद (वय २९ वर्षे) या आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडील चौकशीतून झारखंडमधून अरुण कुमार मंडल (वय २७ वर्षे), मोहमद शहाबाज (वय २० वर्षे) आणि राहुल या ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने केलेल्या कारवाईत मोबाईल फोनवर बँकेतून बोलत असून ओटीपी नंबर मिळवत लाखो रुपये बँक खात्यातून चोरणाऱ्या आरोपीना झारखंडमधून अटक करण्यात आली आहे.
डिसेंबर २०१८ च्या दरम्यान प्रिया रावल ही पीडित महिला कांदिवली ते बोरिवली या दरम्यान रेल्वेने प्रवास करीत असताना त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. तेव्हा आरोपींनी त्यांना आपण कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असून पीडित महिलेला तिचा पॅनकार्ड व आधार कार्ड क्रमांक सांगून मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी नंबर विचारला. पीडित महिलेने ओटीपीनंबर देताच तिच्या बँक खात्यातून तात्काळ ६६ हजार ११ रूपये आरोपीने लांबविले.
एअरटेल मनी व व्होडाफोन वॉलेटच्या माध्यमातून लागला आरोपींचा तपास
पीडित महिलेकडून जीआरपी पोलिसांना तक्रार केली असता या संदर्भात बँक खात्यातून काढण्यात आलेले पैसे एअरटेल मनी व व्होडाफोन वॉलेटमध्ये वळविण्यात आले असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी नवी मुंबईतील कळंबोली परिसरातून बिहारीमतो प्रसाद या आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी ग्राहकांचे मोबाईल बिल , वीज देयके व इतर रिचार्ज करण्याचा व्यवसाय करीत होता. झारखंड मधील टोळी मोबाईल फोनच्या माध्यमातून पैसे लुटून एअरटेल मनी व व्होडाफोन वॉलेटमध्ये पाठवित होती. आरोपी बिहारीमतो हा त्याचे कमिशन घेऊन सदरचे पैसे पुन्हा झारखंड मधील टोळीला पाठवत असल्याचे पोलिसांच्या तापासत समोर आले आहे.