मुंबई - विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईमधील ३६ मतदार संघामधून ३६६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगर अशा दोन विभागात विभागले आहे. मुंबई शहर मध्ये १० तर उपनगरात २६ असे एकूण ३६ मतदार संघ आहेत. या ३६ विधानसभा मतदार संघामधून ४४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ७६ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले असून ३६६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. शहरातील १० मतदार संघामधून १०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर मुंबई उपनगरातील २६ मतदारसंघातून ३३५ उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यापैकी २७२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा नामांकन अर्ज वैध, आशिष देशमुखांची मागणी फेटाळली
अणुशक्ती नगर मतदार संघातून सर्वात जास्त २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर सर्वात कमी माहीम आणि वांद्रे पश्चिम या दोन मतदार संघातून प्रत्येकी ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांना येत्या सोमवारी म्हणजेच ७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.