मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोना काळात तुरुंगाच्या क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणावर आरोपी तुरुंगात कैद करण्यात आल्याने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ४ हजार २५३ कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. जेणेकरून तुरुंगात प्रमाणापेक्षा जास्त कैद आरोपींवर कोरोनाचा प्रसार होऊ नये. मात्र, कोरोना नियंत्रणात आल्यानंतर राज्यातील सुमारे ४०० कैदी कारागृहात परतलेच नाही. मुंबई पोलिसांनी त्यापैकी १८ कैद्यांना पकडून पुन्हा तुरुंगात पाठविले असल्याची माहिती कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे.
पॅरोलवर करण्यात आली होती सुटका: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच्या काळात ४ हजार २५३ कैद्यांना पॅरोल देऊन घरी जाण्यास विशेष परवानगी देण्यात आली होती. परंतु कोरोना आटोक्यात आल्यानंतर पॅरोलवर सोडलेल्या कैद्यांना पुन्हा कारागृहात बोलावले असता त्यापैकी सुमारे ४०० कैदी कारागृहात परतले नाहीत. आता त्यातील १८ जणांना मुंबई पोलिसांनी पकडून तुरुंगात पाठवले आहे. मात्र, अद्यापही सुमारे ३५० कैदी कारागृहाबाहेर असून त्यांचा शोध सुरू आहे. मुंबईत सतत येणारे धमकीच्या फोनचे सत्र आणि त्यात या कैद्यांचा शोध घेऊन पुन्हा तुरुंगात रवानगी करणं यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मुंबई पोलिसांचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी कोरोनामध्ये गुन्हेगारांना पॅरोलवर सोडण्यात आले होते, कोरोना आटोक्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगात जायचे होते, पण काही कैदी आले नाहीत. त्यामुळे त्यांना पकडून कारागृहात सोडावे लागत आहे, अशी माहिती दिली आहे.
अन् कैदी परतलेच नाही: सत्यनारायण चौधरी पुढे म्हणाले की, आम्ही संपूर्ण यादी घेतली असून त्यानुसार सर्व पोलिस ठाण्यांना याबाबत काम देण्यात आले आहे. आतापर्यंत आम्ही १८ जणांना अटक करून त्यांना पुन्हा कारागृहात पाठवले आहे. काही लोकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील २० तुरुंगांमध्ये ३५ हजारहून अधिक कैदी आहेत, जे तुरुंगांच्या क्षमतेपेक्षा जास्त आहेत. वाढत्या कोरोनाच्या संसर्गाचा धोका पाहून 2020 मध्ये महाराष्ट्रातील कारागृहातून ४ हजार २५३ कैद्यांना गर्दी कमी करण्यासाठी घरी जाण्याची विशेष परवानगी देण्यात आली होती. मात्र कोविड संपल्यानंतर पुन्हा कारागृहात जाण्याची वेळ आली तेव्हा सुमारे ४०० जण भूमिगत झाले आहेत.
पोलिसांची विशेष मोहिम: मुंबई कारागृहातून ७२ कैद्यांची सुटका झाली. त्यातील काही तुरुंगात परतले तर काही जण अज्ञातवासात गेले. त्यामुळे आता त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्यासाठी पोलिसांना विशेष छापा मोहीम राबवावी लागणार आहे. ओळख बदलून लपलेल्या कैद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना कधी कुरिअर बॉय तर कधी इन्शुरन्स एजंटच्या वेशात जावे लागले. त्यानंतरच पोलिसांना कैद्यांना पकडण्यात यश मिळाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ३५० कैदी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. विशेष छापा मोहिमेसोबतच मुंबई पोलिसांनी अन्य गुन्ह्यांतील १९३ फरार आरोपींनाही अटक केली आहे. जवळपास ७२ फरार लोकांनाही अटक करण्यात आली आहे. मुंबईतील वॉन्टेड, फरार किंवा पॅरोलवर सुटलेल्या सर्वांना अटक करून त्यांना परत तुरुंगात पाठवण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, त्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. कोरोनाच्या वेळी पॅरोलवर सुटलेल्या कैद्यांपैकी 350 तुरुंगात परतले नसल्याने त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यासाठी पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.