मुंबई: तक्रारदार जठाराम माजी प्रजापती (वय २८ वर्षे) हा दादीशेठ अग्यारी लेन येथील बाबूलाल होगाजी प्रजापती (वय ३८ वर्षे) या आडतियाकडे पैसे तसेच कपड्यांचे पार्सल घेण्या-देण्याचे काम करतो. २५ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तक्रादार जठाराम हा विष्णुकांती अंगदीया यांच्याकडून त्याचा शेठ असलेल्या बाबूलाल होगाजी प्रजापती यांचे व्यवहाराचे ३२ लाख रुपये घेऊन पायी येत होता. यावेळी काळबादेवी येथील आदर्श हॉटेलजवळ येथे एक अनोळखी पुरुष आणि एका अनोळखी महिलेने ते सेल्स टॅक्स अधिकारी असल्याचे भासविले. यानंतर आरोपीने जठाराम याच्याकडील ३२ लाख रुपये आणि त्याचा मोबाईल फोन लंपास केला. मोबाईलची किंमत अंदाजे १५ हजार रुपये होती. एकूण ३२ लाख १५ हजार रुपये किंमतीची मालमत्ता फसवणूक करून दोघे तोतया सेल्स टॅक्स अधिकारी घेऊन गेले. याबाबत जठाराम याने दोन अज्ञात इसमांविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली. जठारामचा सविस्तर जबाब नोंद करून भारतीय दंड संविधान कलम ३६५, ४२०, १७०, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्ह्याची कबुली: गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस पथकाने गुन्ह्याचे घटनास्थळ आणि आजुबाजुच्या परिसरातून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्यानंतर आरोपींनी वापरलेल्या बाईकचा माग काढून गुप्त बातमीदाराच्या मदतीने या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात आला आणि पुरुष आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी सखोल तपास करता त्याचे नाव संजयसिंग अजमेरसिंग करचोली (३३ वर्षे) असल्याचे समजले. तो मंगलदास मार्केट याठिकाणी सुरक्षा रक्षक सुपरवायझर म्हणून काम करीत असल्याचे सांगण्यात आले. त्याच्यासोबत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारी त्याची साथीदार असलेली रजिया अजिज शेख (३६ वर्षे) हिच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. दोघांनाही या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे.
आरोपीला 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी: या गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. आरोपी संजयसिंग अजमेरसिंग करचोली हा मध्य प्रदेशातील जुगनाई (पोस्ट, सुरसा, जि. रेवा) येथील आहे. तर आरोपी रजिया अजीज शेख (वय ३६ वर्षे) ही घाटकोपर येथे राहणारी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. गेल्या महिन्यातच धानजी स्ट्रीट येथे तोतया ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकून अडीज किलो सोने आणि १५ लाख रोकड लंपास केली होती. घटनेचा तपास करत गोपनीय माहितीच्या आधारे एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 24 तासाच्या आत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.