मुंबई - मुंबईत गोवंडी शिवाजी नगर येथे एक घर कोसळून 11 जण जखमी झाले आहेत. जखमींना महापालिकेच्या राजावाडी आणि सायन रुग्णालयात दाखल केले असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर 7 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
3 जणांचा मृत्यू -
मुंबईत गोवंडी शिवाजी नगर प्लॉट नंबर 3, बॉम्बे हॉस्पिटल येथील तळ अधिक एक मजल्याचे घर आज पहाटे 5 च्या सुमारास कोसळले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 10 जणांना बाहेर काढून 7 जणांना राजावाडी तर 3 जणांना सायन रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यापैकी नेहा शेख (35 वर्ष), मोकर शेख (85 वर्ष), शमशाद शेख (45 वर्ष), फरीन शेख (22 वर्ष) या चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राजावाडी रुग्णालयातुन देण्यात आली.
हेही वाचा - कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मांगुर येथे साचले पाणी, वाहतूक बंद
7 जणांवर उपचार -
राजावाडी रुग्णालयात दाखल असलेल्या परवेझ शेख (50 वर्ष), अमिना शेख (60 वर्ष), अमोल धेडाई (38 वर्ष), स्यामूल सिंग (25 वर्ष) यांची प्रकृती स्थिर आहे. तर मोहम्मद फैज कुरेशी (21 वर्ष), नमरा कुरेशी (17 वर्ष), शाहिना कुरेशी (26 वर्ष) यांच्यावर सायन रुग्णालयात अपघात विभागात उपचार करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.