ठाणे: भिवंडी शहरामध्ये गोवर रुबेलाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यत महापालिका हद्दीतील ३ बालकांचा गोवर रुबेलाच्या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना काळात उपाययोजनांच्या धर्तीवर महानगरपालिका गोवर, रुबेला प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार असल्याचे प्रतिपादन पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी केले. नुकताच उपययोजना संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाला प्रशासक तथा आयुक्त यांनी अलर्ट राहून तातडीच्या सुविधा नागरिकांना पुरविण्यासाठी निर्देश दिल्यानुसार भिवंडी महानगरपालिका आता अलर्ट मिशन काम करणार असल्याने गोवर, रुबेला अशा रोगावर नियंत्रण आणण्याकरीता महानगरपालिकेने कंबर कसली असल्याचे सांगण्यात आले आहे.
लाभार्थ्यांना मोफत लस व विटामिन ए: भिवंडी महानगरपालिकेने यापूर्वी पालिका क्षेत्रातील गोवर व रूबेला प्रादुर्भावाबाबत नागरीकांच्या जनजागृतीसाठी विविध शाळांतील विद्यार्थी, मनपाचे आरोग्य केंद्र, विद्यार्थ्यांच्या वतीने जनजागृती रैली, विविध समाजातील धार्मिक गुरु यांनी आपआपल्या धर्मस्थळावरून जनजागृती करण्याचे काम केले आहे. अशा पध्दतीने डॉक्टर्स व नागरीकांमध्ये वेगवेगळ्या जनजागृती कार्यक्रम आयोजित करून प्रभावीपणे जागृतीचे कार्य केलेले आहेत. यापुढे आयुक्त यांनी नागरीकांना आवाहन करताना सांगितले की, गोवर व रूबेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा त्यावर प्रभावीपणे मात करावयाची असल्याने शहरातील नागरिकांनी आपल्या मुलांना ताप किंवा अंगावर पुरळ आल्यास जवळच्या आरोग्य केंद्रावर महानगरपालिकेने दिलेल्या मोफत औषधोपचाराचा फायदा घ्यावा. तसेच महानगरपालिकेच्या वतीने ९ महीने ते ५ वर्षे वयोगटातील ज्या लाभार्थ्यांनी गोवर रुबेला डोस घेतला नाही, अशा लाभार्थ्यांना महानगरपालिकेच्या वतीने मोफत लस व विटामिन ए पुरविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मुलांच्या लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या मुलांचे गोवर, रूबेला या आजारांपासून संरक्षण होणार आहे.
रोग हवेतून वेगाने पसरत असल्यामुळे आयसोलेशनची सुविधा: हा रोग हवेतून वेगाने पसरत असल्यामुळे अशा रुग्णांना आयसोलेशनची सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेच्या खुदाबक्ष हॉल हा सोयी सुविधा युक्त करणार असल्याचे आयुक्त म्हसाळ यांनी सांगून, रुग्णांबाबत हॉटस्पॉट, हायरिस्क असलेल्या भिवंडीतील ठिकाण टार्गेटवर ठेवून या विषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. आणि वेगवेगळ्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मदत घेवून गोवर, रुबेलाच्या लक्षणाबाबत आणखी प्रचार व प्रसार करून हा रोग भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातून हद्दपार करण्यासाठी टिमवर्क करून त्यावर मात करणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी शहर अभियंता सुनिल घुगे, सहाय्यक आयुक्त तथा प्र. उपायुक्त प्रणाली धोंगे, सहाय्यक आयुक्त (आरोग्य) प्रिती गाडे, मनपा वैद्यकीय अधिकारी बुशरा सय्यद, सर्व प्रभागाचे सहा. आयुक्त, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
मिशन अलर्ट वैशिष्टये-
१. कोरोनाच्या धर्तीवर वाॅर रुम स्थापना व कर्मचाऱ्यांची नियुक्ती
२. हॉटस्पॉट व हायरिस्क एरियामध्ये स्पेशल कॅम्पचे आयोजन
३. ४५ रुग्णांच्या यादीनुसार प्रभाग अधिकारी, मेडीकल ऑफीसर व आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत माजी नगरसेवक, समाजसेवक, विविध धर्मगुरुची बैठक घेवून जागृती व लसीकरण मोहीम करणार
४. गोवरच्या लक्षणांबाबत सर्वेक्षण व विद्यार्थ्यांची मदत घेवून प्रचार, प्रसार करणार आणि सोशल मिडीया, बॅनरद्वारे जनजागृती करणार
५. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण, व्हॅक्सिनेशन व पाठपुरावा
६ महानगरपालिका शाळांमध्ये व्हॅक्सिनेशन न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबतचा निर्णय
७. खाजगी डॉक्टरांकडे उपचारार्थ जाणाऱ्या रुग्णांचे माहितीचे संकलन करून क्रिटीकल सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी प्रयत्नशिल
८. गंभीर रोग उद्भवू नये याकरीता शहरामध्ये साफसफाई मोहीम
९. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी झोपडपट्टया, शाळा, आदिवासी पाडे, डपिंग ग्राऊंडवरील रॅक पिकर, सायंकाळी फ्लायओवरब्रिज खालील मुलांना सुविधा पोहचविण्यासाठी उपाय योजना व स्पेशल कैम्प चे आयोजन
१०. रोग नियंत्रणासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज
११. प्रभाग समिती निहाय हॉस्पिटल, दवाखान्यांमधून रुग्णांची माहिती नियुक्त कर्मचा-याच्या माध्यमातून पाठपुरावा
१२. आपत्कालीन परिस्थितीमुळे मनपातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या रजा रद्द
१३. मनपा क्षेत्रातील वाढत्या रुग्णाचे उपचारार्थ प्रभाग समिती ४ मधील खुदाबक्श हॉल हा संपूर्ण सोयी सुविधा युक्त करणार व स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालय येथे २० बेड आयसोलेशन व अंडर ऑब्झर्वेशन साठी उपलब्ध ठेवणार
गोवरमुळे मृत्यू झालेल्या बालकांची संख्या 3: भिवंडीत गोवरमुळे एका आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी भिवंडीत दोनजणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भिवंडीत गोवरमुळे आतापर्यंत तीन बालकांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. भिवंडीत गोवराचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढलेल आहे. येथील इस्लामपूर भागात राहणाऱ्या एका आठ महिन्यांच्या मुलावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृत्यूची माहिती भिवंडी महापालिकेने गुरुवारी दिली. भिवंडीत यापूर्वी एका सहा महिन्यांच्या आणि १४ महिन्याच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे भिवंडीत गोवरमुळे मृत्यू झालेल्या बालकांची संख्या तीन झाली आहे.