मुंबई - २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये जाणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शिखर बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यांसदर्भात शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
ईडीने माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण ईडीला पूर्णपणे सहकार्य करण्याची माझी भूमिका असल्याचे पवार म्हणाले. तसेच माझा नक्की गुन्हा काय आहे? हे समजून घेणे गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले.
काल शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. यांसदर्भात शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून, मी स्वत: २७ सप्टेंबरला मुंबईच्या ईडी कार्यालयात जाणार असल्याचे पवार म्हणाले.
राज्य सहकारी बँकेचा मी कधीही संचालक नव्हतो
राज्य सहकारी बँकेचा मी कधीही संचालक नसल्याचे शरद पवार म्हणाले. तपास करणाऱ्या यंत्रणेला आधिकार आहेत. मी त्यांना सहकार्य करणार आहे. मी संविधानावर विश्वास ठेवणारा असल्याचे पवार म्हणाले.
राज्य सहकारी बँक ही महत्त्वाची आहे. ज्या कालखंडामध्ये चौकशी करण्याची भूमिका घेण्यात आली, त्यात एका पक्षाचे लोक नव्हते. राज्यात पक्षीय विचार दूर ठेवून काम करण्याची परंपरा होती. आता मात्र सत्तेतील लोक तसे राहिले नसल्याचे पवार म्हणाले.
काय म्हणाले पवार?
- माझ्या आयुष्यातला दुसरा प्रसंग आहे. १९८० ला शेतकऱ्यांसाठी जळगाव ते नागपूर दिंडी काढली होती. तेव्हाही मला अटक करण्यात आली होती. त्यांनतर आता दुसऱ्यांदा खटला दाखल झाला आहे.
- शोध घेणाऱ्या यंत्रणेला सहकार्य करणार
- शुक्रवारी २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता ई़डीच्या ऑफिसमध्ये स्वत: जाणार
- आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास आहे. त्यामुळे सहकार्य करणार
- महाराष्ट्रावर शिवरायांचे संस्कार आहेत, दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही.
- ते ताकदीची भीती दाखवत असतील तर पूर्ण ताकदीने सामोरे जाणार
- पुढचा एक महिना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरणार
- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीला समर्थन मिळत आहे. ते पाहिल्यानंतरच कारवाई झाली असण्याची शक्यता
- मी या महाराष्ट्र बँक सहकारी संस्थेत कधीही संचालक राहिलेलो नाही
- निवडणुकीच्या तोंडावर कारवाई याचा अर्थ लोकांना माहित आहे.