मुंबई - तौक्ते चक्रीवादळाने कोकणात मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकार या नुकसान भरपाईसाठी कोकणातील ७ जिल्ह्याला २५० कोटी रुपये देणार आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. याबाबत उद्या (27 मे) कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सर्वांना नुकसान भरपाई मिळणार
'मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. एनडीआरएफचे काही निकष आहेत ते बदलावेत, यासाठी आम्ही केंद्राशी बोलणार आहोत. फळ बागांचे देखील नुकसान झालेले आहे. शाळांचे नुकसान झालेले आहे. त्याचीही भरपाई देण्यात येईल. नुकसान भरपाईपासून कोणीही वंचित राहणार नाही', असे वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले आहे.
केंद्राकडे पथकाची मागणी
'आम्ही केंद्राकडे 3 दिवसांपूर्वी पत्र पाठवले आहे. तातडीने तुमचे पथक पाहणी करायला पाठवा, अशी मागणीही केली आहे. पण अजून पथक आलेलं नाही', असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राज्याच्या परिस्थितीवर चर्चा