मुंबई - कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अफवा, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जातोय. अशा गुन्हेगारांच्या विरोधात महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाने राज्यात 230 गुन्हे दाखल केले आहेत.
राज्यात सर्वाधिक सायबर गुन्हे बीड जिल्ह्यात २७ असून, पुणे ग्रामीण १७, मुंबई १६, कोल्हापूर १६, जळगाव १३, सांगली १०, नाशिक ग्रामीण १०, जालना ९, सातारा ८, नाशिक शहर ८, नांदेड ७, परभणी ७, ठाणे शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५ ,नवी मुंबई ५, सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलढाणा ४, पुणे शहर ४, गोंदिया ४, सोलापूर शहर ३, रायगड २, उस्मानाबाद २, ठाणे ग्रामीण १, धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
राज्यात आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १०६ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडिया ज्यात ऑडिओ क्लिप व यु-ट्यूब सारख्या माध्यमांचा गैरवापर केल्या प्रकरणी ४० गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर पोलिसांनी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक केली आहे .
बीड मध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तर नाशिक ग्रामीण मध्ये खोटी माहिती पसरविण्याचे प्रयत्न -
बीड शहरांतर्गत असणाऱ्या पेठ पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी अजून एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे बीड जिल्ह्यात नोंद झालेल्या सर्व गुन्ह्यांची संख्या २७ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर (फेसबुक इत्यादी) सध्या चालू असलेल्या कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देऊन, दोन धर्मात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकेल, अशा आशयाच्या पोस्ट्स टाकल्या होत्या.
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गत येणाऱ्या जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये अजून एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने, कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या, कोरोना विषाणूमुळे प्रादुर्भावित परिसर, याबाबत चुकीची माहिती कोणतीही खातरजमा किंवा ऊपलब्ध सरकारी माहिती बरोबर न तपासता, व्हॉट्सअॅप ग्रुपवरून पसरविली होती. ज्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याचा संभव होता .