मुंबई - दहिसर कांदरपाडा येथे वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 23 जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी घडली. हा केक ज्या दुकानातून आणण्यात आला त्या दुकानाकडे पालिकेची परवानगी नव्हती. मुंबईत परवानग्या नसलेली अनेक दुकाने आणि हॉटेल सुरू आहेत. त्यांच्यावर तसेच या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी पालिका सभागृहात हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली.
हेही वाचा - धक्कादायक..! भिवंडीत नराधम बापाचा अत्याचार, अल्पवयीन मुलगी गर्भवती
दहिसर पश्चिम येथील कांदरपाडा परिसरात राहणारे अर्जुन सिंग यांच्या मुलीचा मंगळवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केक व इतर पदार्थ खाल्ल्यानंतर उपस्थितांपैकी काहींना उलट्या आणि मळमळ होऊ लागले. काहींच्या पोटात दुखू लागले. या प्रकारानंतर बाधितांना तातडीने बोरिवली येथील भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये 5 ते 6 लहान मुले, 11 महिला आणि इतर पुरुषांचा समावेश आहे. या प्रकरणाचे पडसाद आज पालिका सभागृहात उमटले. शिवसेनेच्या नगरसेविका व विधि समितीच्या अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे या प्रकरणाला वाचा फोडली. केक खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आल्याने त्या दुकानाला पालिका अधिकारी आणि पोलिसांच्या समक्ष भेट दिली असता त्या दुकान चालकाकडे अन्न व औषध प्रशासनाचे नोंदणी प्रमाणपत्र होते. मात्र, आरोग्या विभागाचा परवाना नव्हता. अशा पद्धतीने दुकानचालक फक्त नोंदनी करत आहेत. मात्र, खाद्यपदार्ध विक्रीचा परवाना मिळवत नाहीत.
खाण्याचे पदार्थ विकणाऱ्या दुकानांना पालिकेच्या आरोग्य विभागाचा परवाना लागतो. अग्निशमन दलाची व इतर परवानग्या लागतात. त्यापैकी एकही परवानगी त्या दुकानदाराकडे नव्हती. असे असताना हे दुकान कसे सुरू होते? असा प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. या दुकानाला एका महिन्यापूर्वीच पालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस दिल्याचे सांगण्यात येते. त्याच वेळी दुकानावर कारवाई करून ते बंद केले असते, तर आज 23 जणांना विषबाधा झालीच नसती, असे म्हात्रे म्हणाल्या. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असता महापौरांनी सखोल चौकशी करून कारवाईचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत.
हेही वाचा - भाजप पदाधिकाऱ्याचा प्रताप; अत्याचार पीडित तरुणीच्या दुचाक्या जाळल्या