मुंबई - मागील अधिवेशनात २९ हजार कोटींची तरतूद केल्यानंतर या अधिवेशनात २२ हजार ९९२ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांत जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील अतिवृष्टी व पूरबाधितांसाठी २२११ कोटींची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना किमान आधारभूत विमा योजनेंतर्गत तांदूळ खरेदी व प्रोत्साहनपर २८५० कोटींची तरतूद करतानाच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्याचा हिस्सा म्हणून हजार कोटींची तरतूद करण्यात आली. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, बळीराजा जलसंजीवनी योजनेसाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आपत्तीच्या काळात महत्त्वाच्या ठरणाऱ्या डिझास्टर मॅनेजमेंटसाठीही १२ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पोषण आहार, अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी तरतूद
केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास याजनेंतर्गत पोषण आहारासाठी सुमारे ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनासाठी ३१३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नगर-बीड-परळी, वर्धा-यवतमाळ-नांदेड व नागपूर-नागभीड या रेल्वे मार्गांकरिता २५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे सुरक्षा बांधकामांसाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
आरोग्यासाठी भरीव तरतूद करतानाच जे.जे. रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय इमारतीसाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली. आपत्कालीन सेवेतील रुग्णवाहिकांच्या खर्चासाठी १३१ कोटींचा निधी, तर रुग्णशलयांच्या कार्यालयीन खर्चासाठी २० कोटींच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- वरळी पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीबाबत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार पुरवणी मागण्यांत तरतूद करण्यात आली आहे. या वसाहतींच्या बाहेरील व अंतर्गत दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘एसटी’साठी १००० कोटींचा निधी. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद.
- निवृत्ती वेतनासाठी ७५० कोटी.
- महापालिका व नगरपरिषदांना विकासकामांसाठी ८७७ कोटी.
- जकात कर रद्द केल्याने नगरपरिषदांना सहाय्य अनुदान ५३३ कोटी.
- अनुसूचित जाती व बौद्ध समाजाच्या घरकुल योजनांसाठी ५०० कोटी.
- मराठा आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत नेमलेल्या ज्येष्ठ वकिलांच्या मानधानसाठी ३ कोटींची तरतूद.
- महिला व बालकांवरील सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता प्रशिक्षण व प्रयोगशाळा तयार करण्यासाठी ४ कोटी ५८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- ज्या कोरोना योद्ध्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना सहाय्य देण्यासाठी ५ कोटींचा अतिरिक्त निधी.
- माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील स्मारकाच्या बांधकामासाठी ६ कोटी ८४ लाखांची तरतूद.
- गरीबांना शिवभोजन थाळीसाठी ३९ कोटी ७२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
रस्ते व पुलांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून रस्ते व पुलांच्या परीक्षण व दुरुस्तीकरीता हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हायब्रिड अॅन्युइटी अंतर्गत रस्ते व पुलांच्या बांधकामांसाठी हजार कोटी तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत आशियाई बँकेकडून होणाऱ्या कर्ज सहाय्यातून होणाऱ्या कामांसाठी ३०६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या बँकेच्या माध्यमातून होणाऱ्या रस्ते व पुलांच्या कामांसाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यमार्ग बिगर अनुशेष या योजनेंतर्गत २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समृध्दी महामार्ग निर्मितीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजासाठी ४०५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.