मुंबई - कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसें-दिवस वाढतच आहेत. मुंबई परिसरात गेल्या 24 तासात 22 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामधील 15 मुंबईमधील तर 7 मुंबई बाहेरील रुग्ण आहेत. आज नव्याने 22 रुग्ण आढळून आल्याने मुंबई परिसरातील एकूण रुग्णांची संख्या 108 झाली आहे.
त्यात मुंबईमधील 73 तर मुंबई बाहेरील 35 रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईमधील 4 तर मुंबईबाहेरील 2 अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये दोन लहान बालकांचा समावेश आहे. त्यातील एक एक वर्षाचा तर दुसरा सात महिन्यांचा बालक आहे.
मुंबई परिसरात गेल्या 24 तासात 294 संशयित रुग्णांना तपासण्यात आले. त्यापैकी 91 संशयित रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी 22 जणांच्या चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 201 संशयित रुग्ण विविध रुग्णालयात उपाचारासाठी भरती करण्यात आले आहेत. आज आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 17 निकट संपर्कातील आहेत. युके, यूएई, आयर्लंडचा प्रवास केलेले 3 प्रवासी आहेत.
10 पुरुष, 10 महिला तर एक वर्षाचा व सात महिन्याचे असे दोन लहान मुले आहेत. 7 जण मुंबई शहरातील, 8 मुंबई उपनगर, 3 पालघर, पुणे, डोंबिवली, कल्याण, वाशी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. कस्तुरबा, ट्रॉमा केअर आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
25 जानेवारीपासून 7571 संशयित रुग्णांना तपासण्यात आले. त्यापैकी 1735 संशयित रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी 108 जणांचे चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात मुंबईमधील 73 तर मुंबई बाहेरील 35 रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईमधील 4 तर मुंबईबाहेरील 2 अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
35 खाटांचे विलगीकरण केंद्र -
महानगरपालिकेद्वारे सेवेन हिल्स हॉस्पिटल येथे एच एन रिलायन्स या संस्थेच्या सहकार्यातून 35 खाटांचे विलगीकरण केंद्र व बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात येत आहे. ही सुविधा नागरिकांसाठी मोफत असेल. त्या शिवाय अतिरिक्त 250 खाटांचे विलगीकरण केंद्र M.C.M.C.R. पवई येथे तयार करण्यात आले आहे.
डॉक्टराचा मृत्यू कोरोनामुळेच -
काल शुक्रवारी रात्री एका खासगी रुग्णालयातील 85 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू हिंदुजा रुग्णालयात झाला. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या डॉक्टरचा मुलगा आणि नातू युके येथून आला होता. त्यांनाही कोरोनाची लागण झाली असा अहवाल खासगी लॅबने दिला होता. खासगी लॅबचा अहवाल योग्य होता का?, हे तापसणीसाठी एनआयव्ही पुणे आणि कस्तुरबा रुग्णालय येथे पाठवण्यात आला होता. याचा अहवाल आज आला असून त्या डॉक्टरचा मृत्यू कोरोनामुळे झाला असून त्याच्या नातवालाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे.