मुंबई - 'बेटी बचाव, बेटी पढ़ाओ' या अभियानाचा प्रसार आणि स्त्री शिक्षणाचे महत्त्व देशभर पसरवण्यासाठी घाटकोपरमधील युवतींनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. घाटकोपर पश्चिम येथील श्रीमती पी.एन.दोशी महिला महाविद्यालयाच्या 21 युवती काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास करणार आहेत. 20 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत हा 3 हजार 700 किमीचा सायकल प्रवास केला जाईल.
घाटकोपर पश्चिम येथील पी. एन. दोशी महिला महाविद्यालय यावर्षी आपले हिरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. दरवर्षी महाविद्यालयाच्यावतीने मुलींसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती केली जाते. यावर्षीही महाविद्यालयाने 21 युवतींची निवड करून काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवासाचे आयोजन केले आहे. हा सायकल प्रवास 35 दिवसांचा असणार आहे. महाविद्यालयाच्या आणि युवतींच्या धाडसाचे पालकांसह सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.
हेही वाचा - कायम स्वरुपाचे मानधन मिळवून देण्याच्या अमिषाने ग्राम रोजगार सेवकांना घातला लाखोंचा गंडा
यासाठी महाविद्यालयाच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गातील निवडलेल्या 21 मुलींचा प्रशिक्षक पुष्पा पटेल मागील दोन महिन्यांपासून दररोज दोन तास कसून सराव करून घेत आहेत. या मोहिमेसाठी मुलींची मानसिक व शारीरिक तपासणी करून त्यांचे समुपदेशन देखील करण्यात आले आहे. यापूर्वीही 2006 मध्ये मुंबई-रत्नागिरी ते रत्नागिरी-मुंबई, 2016 मध्ये मुंबई-पुणे ते पुणे-मुंबई अशा प्रकारे यशस्वी सायकल प्रवसाचे आयोजन करण्यात आले होते.
काश्मीर ते कन्याकुमारी या सायकल प्रवसासाठी महाविद्यालयाने अनेक राज्यांची परवानगी घेतली आहे. स्त्री शिक्षणाचे महत्त्व जनतेला पटवून देण्याचा आणि जनजागृती करण्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असतो. मुलींमध्ये देखील मुलांप्रमाणे धाडस असते हे वेळोवेळी आमच्या महाविद्यालयातील युवतींनी दाखवून दिले आहे, असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा मेनन यांनी सांगितले.
या 21 धाडसी युवती करणार सायकल प्रवास -
सीमा सुर्वे, झिबा सिद्दीकी, रिमा चौधरी, शिवानी पालव, मोहिनी रसाळ, आचल सिंग, मोहसिना शेख, आरिफा पटेल, भाग्यश्री चव्हाण, परिणिता नहा, ज्योतिका रावल, मोहिनी बामणे, सोफिया सय्यद, अंकिता केंजळे, श्रुती फाळके, ईकरा हलसिकर, साक्षी पेंडूरकर, प्रज्ञा शेलटे, वाय. जी. खुशी माने, श्रद्धा तामोरे, सरोज सहानी.