मुंबई : दोन हजारांची नोटबंदी झाली खरी पण गुन्हेगारांच्या हिटलीस्टवर व्यापारी आले आहेत. नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनात आणलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये धाव घेतली. याचाच फायदा घेत परराज्यातील व्यापारी मुंबईच्या बाजारात नोटा बदलण्यासाठी येताना दिसत आहेत. हेच व्यापारी गुन्हेगारांचे टार्गेट असल्याचे चित्र दिसत आहे. 2000 च्या नोटाबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले असल्याची माहिती, माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी दिली.
४२ लाखांची रक्कम घेऊन पसार : बहुतांश ठिकाणी कमिशन देऊन या नोटा बदलण्यात येत आहेत. तर, दुसरीकडे याचाच फायदा घेत भामटे व्यापाऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारत आहेत. अशाच काही घटना मुंबईत घडल्या आहेत. झवेरी बाजारातील व्यापाऱ्याला दागिने देण्याच्या बहाण्याने त्यांची ४२ लाखांची रक्कम घेऊन पसार झालेल्या आरोपीला, लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राजस्थानमध्ये दोन दिवस पाळत ठेवून आरोपीला अटक केली. हुकूमसिंग राजपूत आणि छत्तरसिंग राजपूत अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ३५ लाख आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली. व्यापाऱ्याने दोन हजारांच्या नोटा दिल्याने त्या भारतीय चलनातून बंद करण्यात आल्या असल्याने, व्यापारी तक्रार देणार नाही असा समज करत त्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचे पोलिसांना सांगितले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. आता 2000 च्या नोटाबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले. - माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी
नोटा बदली करण्यासाठी लगबग : मुंबईतील झवेरी बाजार सारख्या बड्या बाजारात काही मंडळी सोन्यामध्ये गुंतवणूक करत काळा पैसा पांढरा करत आहेत. तर कमिशन स्वरूपात मोठ्या प्रमाणात असे व्यवहार सुरू असल्याचे सूत्राने सांगितले. मुंबईतील मोठ्या बाजारात परराज्यातील व्यापाऱ्यांची दोन हजारच्या नोटा बदली करण्यासाठी लगबग वाढली असल्याचे सूत्राने सांगितले.
बनावट नोटा घेऊन बँकेत : दहिसर येथील रहिवासी असलेले ३५ वर्षीय तक्रारदार हे एका खासगी बँकेच्या ताडदेव येथील शाखेमध्ये व्यवस्थापक आहेत. व्यवसायाने सेल्समन असलेले मुंब्रा येथील रहिवासी शेख हा २६ मे च्या दुपारी तीनच्या सुमारास दोन हजार रुपयांच्या दहा नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत आले. त्यांनी अर्ज भरुन नोटा बदलण्यासाठी बँकेतील कॅशिअरकडे दिल्या. कॅशियरने नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताच त्यांनीही तपासणी केली, तर त्या नोटा बनावट असल्याचे दिसून आले. नागपाड्यातील दुकानाचे मालक इसरार शेख यांनी त्या नोटा जमा करण्यासाठी पाठविल्याचे सांगितले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत ताडदेव पोलिस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली आहे.
नोटा बदलण्यासाठी परराज्यातील व्यापारी मुंबईत : मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेल्या तक्रारदार हरिराम धनाराम घोटिया (३१) यांचा ज्वेलरी कामाचा व्यवसाय आहे. घोटिया हे सध्या हैदराबादमध्ये वास्तव्यास आहेत. गेल्या आठवड्यात ते खासगी बसने मुंबईत आले. घोटिया यांच्याकडे दोन हजारांच्या नोटांची २७ लाखांची रक्कम आणि ११ कोटी १० लाखांची सोन्याची बिस्किटे तसेच सव्वा कोटींचे हिरेजडीत दागिने होते. घोटिया आणि त्यांचे सहकारी मुंबईत उतरताच त्यांना एका चौकडीने दिल्ली क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून ताब्यात घेतले. या लुटारूंनी त्यांच्याकडील एकूण २ कोटी ६२ लाख किमतीचा ऐवज काढून घेतला. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवले. सायन पोलिसांचे एक पथक राजस्थानला रवाना झाले. गुन्ह्यात एका ओळखीच्याच व्यक्तीचा हात असल्याची माहिती समोर येत असून, पोलिस पथकाने काही जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी आरोपींना बेडा देखील ठोकण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -