मुंबई - शहरातील मोनोरेलच्या सुरक्षेसाठी आता श्वानपथक तैनात असणार आहे. मुंबईकरांच्या आणि मोनोरेलच्या सुरक्षेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनोरेल सुरक्षा रक्षकांच्या पथकात 'स्निफर डॉग' पथकाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चेंबूर ते जेकब सर्कल मार्ग मोनोरेल सुरक्षा पथकात आणि 17 मोनो स्थानकांत लवकरच 20 स्निफर डॉग समाविष्ट होणार आहेत. सहायक महानगर आयुक्त बी जी पवार यांनी 'ईटीव्ही भारत'ला ही माहिती दिली.
स्निफर डॉग हे सुरक्षेच्या कामासाठी वापरले जातात. वासावरून श्वान वस्तू, व्यक्ती (आरोपी) व अगदी बॉम्बही शोधून काढतात. त्यामुळे पोलीस आणि सैन्यात स्निफर डॉगच्या पथकाचा समावेश असतो. हे स्निफर डॉग आता मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखल होणार आहेत. या स्निफर डॉगच्या खरेदीसाठी एमएमआरडीएने नुकतीच एक निविदा काढली आहे. 1 कोटी 67 लाख रुपये खर्च करत खरेदी केलेले हे 20 स्निफर डॉग लवकरच मोनोरेल मार्गावरील 17 स्थानकांवर तैनात केले जातील, असे पवार यांनी सांगितले. मोनोरेलची आणि प्रवाशांची सुरक्षा आमच्या दृष्टीने महत्वाची आहे. अशावेळी विविध प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याच्या दृष्टीने स्निफर डॉगचा पर्याय आम्ही पुढे आणल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.