मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने राज्य शिक्षण मंडळाची 12 वीची पुस्तके आणि त्याचे वितरण होऊ शकले नाही. यामुळे ही पुस्तके काल बालभारतीने पीडीएफ स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध करताच दीड दिवसांत अडीच लाखाहून अधिक पुस्तके ही केवळ विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केली असल्याची माहिती समोर आली आहे. यात शाळा आणि खाजगी संस्था यांची संख्या लक्षात घेता, ती तीन लाखांहून अधिक असल्याची माहिती बालभारतीकडून देण्यात आली.
यंदा बारावीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके बदलली आहेत. मात्र, प्रिंटींग केलेली पुस्तके बाजारात पोहचली नाहीत. विद्यार्थी पालकांना अडचण होवू नये म्हणून राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) नेही पुस्तके आपल्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात दिली आहेत. एकाच दिवशी, तब्बल अडीच लाखाहून अधिक जणांनी पुस्तके डाउनलोड करुन घेतली आहेत. या पुस्तकांमध्ये सर्वात जास्त मराठी आणि इंग्रजी माध्यमाची पुस्तके विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केली आहेत. तर कन्नड, तेलगू, गुजराती, हिंदी भाषेतील पुस्तके डाऊनलोड करण्याचे प्रमाण हे अत्यंत कमी असल्याची माहितीही देण्यात आली.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे ही पुस्तके बाजारात आली नसल्याने पीडीएफ स्वरुपात ऑनलाइन द्यावीत अशी मागणी होत होती. याला प्रतिसाद देत आता बालभारतीकडून बुधवारी संकेतस्थळावर पुस्तके अपलोड केली आहेत. यामध्ये, माध्यमनिहाय पुस्तके असून प्रत्येक पुस्तक पीडीएफनुसार मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पुस्तके डाउनलोड केली जात असल्याने बालभारतीच्या सर्व्हरवरही मोठा ताण पडला आहे. काही वेळेला एक पुस्तक डाउनलोड करुन घेण्यासाठी वेळ लागत आहे. इंटरनेटची समस्या व ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना पालकांनाही याचा त्रास होत आहे.
राज्यात सद्या नववी आणि अकरावीची परीक्षा झाली नाही. त्याचबरोबर बारावीचीही पुस्तके बाजारात आली नाहीत. यामुळे पालक आणि विद्यार्थी या लॉकडाउन काळात अडचणीत होते. बालभारतीने पुस्तके उपलब्ध केली असल्याने मोठ्या प्रमाणात ऑनलाइन मागणी आहे. अकरावीला असणारा विद्यार्थी, पालक आणि शिक्षक पुस्तके घेत डाउनलोड करुन घेत असल्याने संकेतस्थळ धिम्या गतीनेही चालत आहे. तरीही येत्या काही दिवसांमध्ये सुमारे १२ ते १४ लाख विद्यार्थीही पुस्तके डाऊनलोड करतील, त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयेही त्याचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आज बालभारतीकडून व्यक्त करण्यात आली.