नवी मुंबई - तळोजा एमआयडीसी परिसरातली खाणीत बुडून पाच वर्षांच्या दोन जुळ्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरावर शोककळा परसली आहे. पनवेल तालुक्यातील वलप गावात गुरुवारी ही घटना घडली.
हेही वाचा - अमरावतीत बंद दरम्यान दगडफेक; पोलिसांनी दिला चोप
लव गंगेश यादव (५) आणि कुश गंगेश यादव (५) अशी मृत मुलांची नावे आहेत. यादव कुटुंब मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंब आपले मूळ गाव सोडून आले होते. गंगेश यादव हे पत्नी आणि दोन मुलांसह वलप येथील शांताराम बेंदर पाटील यांच्या चाळीत राहत होते. हे दाम्पत्य काही कामानिमित्त गुरुवारी बाहेर गेले होते. या दरम्यान त्यांची जुळी मुले गणेश नगर परिसरात खेळत होते. खेळताना एकाचा पाय घरसला आणि तो खाणीत पडला. आपला भाऊ बुडत असल्याचे पाहताच दुसऱ्यानेही त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. काही वेळानंतर ही बाब येथील रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर दोघांचेही मृतदेह खाणीतून बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा - शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा हटवली, राष्ट्रवादी आक्रमक
या घटनेने यादव दाम्पत्याची दोन्ही अपत्ये नियतीने हिरावून नेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लव आणि कुश 'लोटस प्री प्रायमरी स्कूल'मध्ये सिनियर केजीत शिकत होते. घरी दारिद्र्य असूनही मुलांचे भविष्य घडवण्यासाठी यादव दाम्पत्याने दोघांनाही खासगी शाळेत दाखल केले होते. आपल्या पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकवून मोठे करण्याचे स्वप्न आई-वडिलांनी उराशी बाळगले होते. परंतु, स्वप्न पाहत असतानाच त्यांच्या पोटाच्या गोळ्यांवर नियतीने घाला घातला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मृतदेहांचा पंचनामा केला असून चौकशी सुरू केली आहे. या चिमुकल्या भावंडांचे पनवेल उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
हेही वाचा - समाजात स्वीकारण्यास आजोबांनी नकार दिल्याने नातीची आत्महत्या; जळगावातील धक्कादायक घटना
जन्म आणि मृत्यूचीही एकच वेळ!
कित्येक भावंडे जुळी म्हणून जन्म घेतात, त्यांचा जन्म सोबत होतो. मात्र मृत्यूची वेळ वेगळी असते. वलप येथे पाच वर्षांच्या या मृत मुलांचा एकापाठोपाठच जन्म झाला. ते दिसायलाही सारखे होते. म्हणून त्यांचे नाव लव-कुश ठेवण्यात आले होते. हे दोघे भाऊ एका दिवशी जन्मले आणि त्यांचा मृत्यूही एकाच दिवशी झाला, हे मन हेलावून टाकणारे असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.