मुंबई- पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान 11 किलो गांजा सह 2 आरोपींना अटक करण्यात आले आहे.सदरच्या अमली पदार्थांची होम डिलिव्हरी करण्याच्या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने ऋषी मिश्रा(21) व शुभम मिश्रा (23) या दोन आरोपींना अटक केली असून, लॉकडाऊन काळात मोटरसायकलवरून (गांजा) अमली पदार्थाची होम डिलिव्हरी दोघे करत होते.
लॉकडाऊन दरम्यान अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्या कारणामुळे मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संदर्भात कारवाई करण्यात येत आहे .गेल्या काही दिवसांपासून मोटर सायकलवरून काही जण हे गांजा अमली पदार्थाची घरपोच डिलिव्हरी देत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या संदर्भात सापळा रचला होता. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रा युनिटने यासंदर्भात अंधेरी पूर्व येथील सलीम कंपाऊंड चीमनपाडा या ठिकाणी सापळा रचला असता, आरोपी 11 किलो गांजा घेऊन आले होते, त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली,तेव्हा आरोपींकडे 2 लाख 75 हजार एवढ्या कींमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
विक्रीसाठी समाज माध्यमांचा वापर
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी अनुक्रमे 21 व 23 वर्षांचे असून समाज माध्यमांचा वापर करून आमली पदार्थांची होम डिलिव्हरी करण्याचे काम ते गेल्या काही महिन्यांपासून करत होते. गांजा या अमली पदार्थांची विक्री हे दोन्ही तरुण त्यांच्याच वयाच्या तरुण वर्गाला विक्री करत होते. या दोन आरोपींच्या अटकेनंतर आणखी किती जण अशा प्रकारच्या अमली पदार्थ विक्रीच्या प्रकरणात सहभागी आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा-जळगाव जिल्ह्यात 'सायटोमेगालो' व्हायरसचा पहिला बळी!