मुंबई - भारतात दुसऱ्या लोटेतही कोरोनाने थैमान घातले आहे. भारतीय रेल्वेत दररोज 1 हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत आहे. तर आतापर्यंत 1 हजार 952 रेल्वे कामागारांचा कोरोनाने बळी घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई विभागातील मध्य-पश्चिम रेल्वेमध्येसुद्धा रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दररोज 1 हजार कर्मचारी कोरोनाग्रस्त
कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात गेल्यावर्षी लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प होती. मात्र, अत्यावश्यक वस्तू आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये म्हणून मालगाड्या सतत धावत होत्या. यावेळीसुद्धा हजारो रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता पुन्हा दुसऱ्या लाटेत कोरोनाने देशभरात हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका भारतीय रेल्वेला बसला आहे. सध्या आपत्कालीन परिस्थितीत भारतीय रेल्वेकडून देशभरात ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. मात्र, या अशा कठीण परिस्थितीत दररोज भारतीय रेल्वेमध्ये 1 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. तसेच, आतापर्यंत 1 हजार 952 भारतीय रेल्वे कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. ही माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी दिली आहे.
मुंबईत 90 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी उपनगरीय लोकल सेवा सुरू आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा होत आहे. आतापर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 1 हजार 742 रेल्वे कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. यातील 1 हजार 600 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 90 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबई विभागात 53 रेल्वे कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत, असे सुनीत शर्मा यांनी सांगितले.
हेही वाचा - पुणे पोलिसांवर उत्तर प्रदेशात जमावाकडून जिवघेणा हल्ला, वाहनांची तोडफोड