मुंबई - सध्या सायकलचा वापर कमी होत चालला आहे. त्यामुळे तरुणांना सायकल चालवण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी अनुप बाबानी यांनी १९३० च्या दशकातील सायकलस्वारांचा इतिहास दुर्मिळ फोटोच्या माध्यमातून चर्चगेट येथील एनसीपीए येथे मांडला आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाला मोठी गर्दी होत आहे.
सात सायकलस्वारांनी १९२० आणि १९३० च्या काळात सायकलवरून जगभ्रमंती केली होती. त्यांना त्याकाळी आलेला अनुभव दुर्मीळ छायाचित्रांतून जाणून घेण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे. या सायकलस्वारांनी १० वर्षांत तब्बल २ लाख ६५ हजार किमीचा सायकल प्रवास केला होता. त्यांच्या सायकल भ्रमंतीची ६० दुर्मीळ छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. १४ मेपर्यंत दुपारी १२ ते रात्री ८ दरम्यान हे प्रदर्शन एनसीपीएच्या पिरामल दालनात मुंबईकरांना पाहता येणार आहे.
या सायकलस्वारांचे मुंबईशी एक वेगळे नाते आहे. कारण हे सातही सायकलस्वार मुंबईतील होते. सायकलस्वार अदि बी. हकिम, जाल पी. बापसोला आणि रुस्तुम बी. भुमगारा यांनी १९२३ आणि १९२८ या काळात जगभरात ७१ हजार किलोमीटरचा प्रवास केला होता.
फ्राम्रोझ दावर यांनी एका ऑस्ट्रियन सायकलस्वारांसोबत ५२ देश आणि ५ खंडात एकूण १ लाख १० हजार कि.मी. सायकल प्रवास केले होते. त्यांचा हा प्रवास १९२४ ते १९३१ या ७ वर्षांच्या काळात सुरू होते. तर केकी खरस, रुस्तुम गांधी आणि रुटन श्रॉफ यांनी ५ खंडांमध्ये ८४ हजार किमी सायकलने प्रवास केले होते.
जगभर विखुरलेल्या या सायकलस्वारांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून १८ महिन्यांत ही छायाचित्रे बाबानी यांनी मिळवली. या सातही सायकलस्वारांनी लिहिलेली प्रवास वर्णनेदेखील ते पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आणणार आहोत. तरुणांनी सायकल चालवण्याकडे वळले पाहिजे. हे प्रदर्शन बाकीच्या शहरातदेखील भरणार आहोत, असे बाबानी यांनी सांगितले.