मुंबई - मुंबईत पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडतात. मुंबईची तुंबईही होते. विशेषकरून समुद्राला भरती असताना मुंबईत पाणी साचण्याचे प्रकार घडतात, असे निदर्शनास आले आहे. यावर्षी तब्बल १८ दिवस समुद्राला मोठी भरती राहणार आहे. यामुळे या १८ दिवसात मुंबईत पुन्हा पाणी साचू शकते. पावसाचा जोर असणार्या जुलै-ऑगस्ट महिन्यात समुद्रात तब्बल १० दिवस साडेचारमीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे या दिवसात मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
'मुंबईकरांनी काळजी घ्यावी'
मुंबईत समुद्राला उधाण असताना प्रचंड उंच लाट किनार्यावर आदळत असतात. साधारणत: साडेचारमीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांपासून धोका संभवू शकतो. याचवेळी अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी समुद्रात जाण्यापासून रोखले गेल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे असे उधाणाचे दिवस पालिकेकडून जाहीर केले जातात. या उधाणांच्या दिवशी मुंबईकर पर्यटकांनी किनार्यावर काळजी घ्यावी, शक्यतो जाणे टाळावे, असे आवाहन केले जाते. उधाणांच्या दिवशी सर्व किनार्यांवर पालिकेसह पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात येतो. शिवाय सुरक्षा यंत्रणाही तैनात ठेवण्यात येत असते.
२६ जून रोजी सर्वांत उंच लाटा
पावसाची सुरुवात असणार्या जून महिन्यात २३ ते २८ जून असे सलग सहा दिवस समुद्राला उधाण येणार आहे. यावेळी साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. शुक्रवार २६ जून रोजी या वर्षातील सर्वात मोठी भरती येणार असून सर्वांत उंच म्हणजे ४.८५ मीटरच्या लाटा उसळणार आहेत. तर ८ सप्टेंबर रोजी १२.४८ वाजता ४.५६ मीटर उंचीच्या तर ९ सप्टेंबर रोजी १.२१ वाजता ४.५४ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
हे आहेत जुलैमधील उधाणाचे दिवस
दिनांक वेळ लाटांची उंची
२३ ११.३७ वा. ४.५९ मीटर
२४ १२.२४ वा. ४.७१ मीटर
२५ १३.०७ वा. ४.७३ मीटर
२६ १३.४८ वा. ४.६८ मीटर
२७ १४.२७ वा. ४.५५ मीटर
ऑगस्टमधील उधाणाचे दिवस
दिनांक वेळ लाटांची उंची
१० १३.२२ वा. ४.५० मीटर
११ १३.५६ वा. ४.५१ मीटर
२२ १२.०७ वा. ४.५७ मीटर
२३ १२.४३ वा. ४.६१ मीटर
२४ १३.१७ वा. ४.५६ मीटर
हेही वाचा -देशाला मिळणारी तिसरी कोरोना लस; स्पूटनिक देशातील बाजारपेठेत पुढील आठवड्यात होणार दाखल