मुंबई - रविवारची (दि.2 फेब्रुवारी) रात्र ही काळ रात्र ठरली असून राज्यात तीन विविध अपघातात 17 ठार, तर 8 जण जखमी झाले आहेत. सांगली, सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यात हे अपघात झाले आहेत.
पहिला अपघात हा सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या झरे-पारेकरवाडी झाला. यात 5 जणांचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. पारेकरवाडी येथील सहाजण आपल्या चारचाकीतून साताऱ्या जिल्ह्यातील चिकली येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. पारेकरवाडीपासून केवळ अर्धा किमी अंतरावर त्यांची गाडी आली असता गाडीचे स्टेअरींग लॉक झाले. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट जवळच्या विहिरीत जाऊन पडली. विहिरीत भरपूर पाणी होते. अशातच गाडीचे दारे उघडली नाही. त्यामुळे पाच जणांचा यात मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त वाचा - अंत्यविधीला जाताना काळाचा घाला; सांगलीजवळ विहिरीत गाडी पडून 5 जणांचा मृत्यू
दुसरा अपघात हा सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात घडला. तालुक्यातील कन्हेर गावात राहणारा किरोश रमेश मोरे याचे 14 फेब्रुवारीला लग्न होणार आहे. याच लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी रमेशचा भाऊ अभिजीत रमेश मोरे (वय 22 रा. कन्हेरगाव ता. माढा) हा त्याचे आजोबा म्हणजे आईचे वडील महादेव नामदेव डांगे (वय 70 रा. पिंपळनेर ता. माढा), यांच्यासोबत बारलोणीला गेले होते. पत्रिका वाटून झाल्यानंतर ते दोघे दुचाकीवरून कन्हेरगावाकडे निघाले. त्यावेळी समोरून येणाऱ्या मालवाहतूक जीपने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. यात जीपच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.
सविस्तर वृत्त वाचा - लग्नपत्रिका वाटून परतणाऱ्या आजोबासह नातवावर काळाचा घाला
तिसरा अपघात हा जळगाव जिल्ह्याच्या यावत तालुक्यातील हिंगोणाजवळ घडला. मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल येथील चौधरी कुटुंबीय मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून चोपडाहून स्वगावी तीन चारचाकी वाहनाने परतत होते. त्यातील एका चारचाकी वाहनाला अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ डंपरने समोरून धडक दिली. यात या चारचाकीतील दहाजण ठार झाले असून सात जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी वाहनाचा यात चुराडा झाला असून डंपर रस्त्यावरून खाली उतरून एका शेतात शिरला. मृत व्यक्ती चिंचोल, चांगदेव (ता. मुक्ताईनगर) आणि निंबोल (ता. रावेर) येथील रहिवासी आहेत.
सविस्तर वृत्त वाचा - जळगावात एकाच कुटुंबातील १० जणांचा आपघाती मृत्यू , मुलीचे रिसेप्शन आटोपून परतत होते घरी