मुंबई Devendra Fadnavis On Mumbai Attack : मायानगरी मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीनं गेटवे इथं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या घराचा त्यासोबतच पोलिसांच्या निवृत्तीनंतर आरोग्य सुविधांचा प्रश्न आम्ही लवकरच सोडवू. सरकार त्याबाबत प्रयत्नशील आहे, अशी माहिती दिली.
मुंबईच्या सुरक्षेसाठी जवानांनी प्राणांची लावली बाजी : या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबईकरांच्या सुरक्षा आणि सेवेसाठी मुंबई पोलीस 24 तास डोळ्यात तेल घालून आपलं कर्तव्य बजावतात. 26/11 च्या हल्ल्यात देखील मुंबई पोलिसांनी आपल्या जrवाचा विचार न करता मुंबईच्या सुरक्षेसाठी प्राणांची बाजी लावली. मात्र, या पोलिसांच्यादेखील अनेक समस्या आहेत. पोलिसांच्या निवारा व्यवस्थेची आणि निवृत्तीनंतर त्यांच्या आरोग्य सुविधांबाबत सरकार प्रयत्नशील आहे. निवृत्तीनंतर देखील पोलिसांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार नियोजन करत आहे. लवकरच पोलिसांना या सुविधा मिळतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर : मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांचा आणि कर्मचाऱ्यांचा गेटवे ऑफ इंडिया इथं गुलाबाचं फुलं देऊन सत्कार करण्यात आला. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाला त्यांचे कुटुंबीय आणि मुंबईतील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यंदाचा कार्यक्रम इटली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये एकाच वेळी होणार आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 या दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे उलटूनही या दहशतवादी हल्ल्याची भिती आणि कटू आठवणी अनेकांच्या मनात अद्यापही कायम आहेत.
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबई एकजुटीनं उभी : “मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यासंदर्भात लोकांच्या मनात अजूनही भिती कायम आहे. त्यातून सावरत पुन्हा त्या उमेदीनं काम करणाऱ्या पोलीस दलांचं, जवानांचं तसेच नागरिकांचं खरोखरच कौतुक वाटते. आजही मुंबई एकजुटीनं उभी आहे, कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबळे यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांतून मशाल रॅली : "महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशननं गेल्या 7 वर्षांपासून सातत्यानं 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या पोलीस अधिकारी आणि नागरिकांच्या स्मरणार्थ हा उपक्रम आयोजित केला आहे. यावर्षी महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांतून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर मशाल रॅली काढून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान, आमच्या असोसिएशनद्वारे वेगवेगळ्या दिव्यांग पोलीस अधिकाऱ्यांना त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी, मोबाईलचा वापर करण्यासाठी आणि कोणत्याही अडचणीशिवाय त्यांची दैनंदिन कामं करण्यासाठी कृत्रिम अवयवाची सुविधा पुरविली जाणार आहे. या उपक्रमादरम्यान गरजू कुटुंबांना मदतीसाठी एक पोलीस कुटुंब कल्याण संघ स्थापन करण्याची सरकारला विनंती करण्यात आली" असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :