मुंबई - मुंबईकरांची पाण्याची तहान भागवण्यासाठी महानगरपालिकेकडून पिंजाळ आणि गारगाई ही दोन धरणे बांधली जाणार आहेत. त्यापैकी गारगाई धरणासाठी जमीन भूसंपादन करण्यासाठी 148 कोटी रुपये खर्च करण्याला सुधार समितीने शनिवारी मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन लवकर होण्यास मदत होणार आहे. गारगाई प्रकल्पामुळे मुंबईकरांना 440 दशलक्ष लिटर जास्त पाणी मिळणार आहे. या प्रकल्पाखाली 220 हेक्टर वनजमीन जाणार आहे. मुंबई महानगरपालिका 220 हेक्टर जमीन नागपूर येथे खरेदी करून तेथे वनीकरण करणार आहे, अशी माहिती सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब यांनी दिली.
हेही वाचा - अवकाळी पावसासाठी आढावा बैठक; मात्र, शिवसेनेच्या 'या' मंत्र्यांची दांडी
मुंबईकरांना मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3 हजार 958 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, मुंबईचा झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणीही वाढत आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार, मुंबई महानगरपालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्प विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. गारगाई प्रकल्पाच्या कामासाठी पालिकेला महाराष्ट्र शासनाच्या 12 नोव्हेंबर 2013 च्या निर्णयानुसार परवानगीही मिळाली आहे.
हेही वाचा - पुणे विभागातील 1 लाख 40 हजार हेक्टर शेतीचे नुकसान, त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश
नवीन धरण प्रकल्पांसाठी जमीन संपादन करण्यासाठी विशेष भूसंपादन कक्ष पालिकेने याआधीच सुरू केला आहे. या धरणासाठी 619 कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. गारगाई प्रकल्पामुळे एकूण 840 हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यातील सुमारे 424 हेक्टर खासगी जमीन वाटाघाटींद्वारे थेट खरेदी पद्धतीने अधिग्रहित करण्यात येणार आहे. या कामाचा अंदाजे खर्च 147.79 कोटी असून हा प्रस्ताव सुधार समितीने मंजूर केला.
नागपूरमध्ये वनीकरण -
गारगाई प्रकल्प ज्या जमिनीवर उभारला जाणार आहे. त्यापैकी 220 हेक्टर जमीन ही वनक्षेत्र आहे. मुंबईत सध्या आरे मधील झाडे तोडण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यामुळे गारगाई प्रकल्पासाठी जी वन जमीन वापरली जाणार आहे. तितकीच जमीन नागपूरला ताडोबा अभयारण्याजवळ महानगरपालिका खरेदी करणार आहे.
पालघर जिल्ह्यात प्रकल्प -
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर 69 मीटर उंचीचे, 972 मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे. गारगाई ते मोडकसागर जलाशयादरम्यान अंदाजे 2 किमी लांबीच्या बोगद्याचे बांधकाम केले जाणार आहे. गारगाई जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर धरणात आणून मुंबईला पुरवण्यात येईल.